नाशिक : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा दुसऱ्या दिवशीही शहरासह जिल्ह्यात विविध राजकीय तसेच सामाजिक संघटना, संस्थांकडून वेगवेगळ्या पध्दतीने आंदोलनांव्दारे निषेध करण्यात आला.

गुरूवारी शहरात शिवसेनेच्या (उध्दव ठाकरे) वतीने शालिमार येथील पक्ष कार्यालयासमोर पहलगाम हल्ल्याचा निषेध करण्यात आला. उपस्थित शिवसैनिकांनी संताप व्यक्त करत पाकिस्तानच्या ध्वजाची होळी करुन पाकिस्तान आणि दहशतवादी यांच्या विरोधात घोषणा बाजी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा देण्याचीही घोषणा करण्यात आली. उपनेते सुनील बागुल, सुधाकर बडगुजर, वसंत गिते, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, राज्य संघटक विनायक पांडे, जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी, महानगरप्रमुख विलास शिंदे आदी उपस्थित होते.

सीटू कामगार संघटनेच्या वतीनेही या हल्ल्याचा निषेध करुन केंद्र सरकारने हल्लेखोरांना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी केली. काश्मीरमध्ये पोलीस आणि सुरक्षा दल हे केंद्र सरकारच्या अखत्यारित आहेत. पर्यटनस्थळी सुरक्षा व्यवस्था करणे आवश्यक होते. ते का झाले नाही, याचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली.

दहशतवादी देशाचे आणि मानव जातीचे शत्रू आहेत. त्यांचा बिमोड करण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने पावले उचलावीत, पर्यटक आणि स्थानिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ते उपाय करावेत, यापुढे असे हल्ले होऊ नयेत, यासाठी प्रतिबंधक कारवाई करावी, अशी मागणी सीटूच्या वतीने करण्यात आली. या हल्ल्याच्या निमित्ताने काही धर्मांध शक्ती समाजामध्ये तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. त्यांच्यावर लक्ष ठेवून त्यांचाही बंदोबस्त करावा, असेही सूचविण्यात आले आहे.

भोसला सैनिकी विद्यालयाच्या वतीने दहशतवादी हल्ल्यातील मृतांना संस्थेच्या वतीने श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. संविधानप्रेमी नाशिककर आणि हुतात्मा स्मारक समितीच्या वतीनेही श्रध्दांजली सभा घेण्यात आली.