नाशिक : लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी बँकेत गेलेल्या २४ वर्षांच्या गरोदर महिलेचा गर्दी आणि दगदग सहन न झाल्याने मृत्यू झाला. दिंडोरी तालुक्यातील उमराळे बुद्रुक येथे ही घटना घडली. दिंडोरी तालुक्यातील आळंदी धरण परिसरानजीक राहणाऱ्या सुलभा लहामगे (२४) या आठ महिन्याच्या गरोदर होत्या. उमराळे बुद्रुक येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी आणि माहिती अद्ययावत करण्यासाठी त्या २९ जानेवारी रोजी मामा संतोष गांगोडे यांच्याबरोबर गेल्या होत्या.

बँकेत प्रचंड गर्दी असल्यामुळे दोन ते तीन तास त्यांना उभे राहावे लागले. त्यामुळे त्यांना चक्कर आली. गांगोडे यांनी त्यांना उमराळे बुद्रुक प्राथमिक केंद्रात दाखल केले. नंतर दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. उमराळे बुद्रुक हे ४० ते ५० गावांचे केंद्रबिंदू असून येथील बँक या गावांना जोडलेली आहे. या बँकेमध्ये कर्मचारी कमी आहेत. त्यातच मोठ्या प्रमाणात शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांची गर्दी होते. त्यामुळे खातेदारांना कित्येक तास गर्दीत उभे रहावे लागते.

सुलभा यांचे सर्व वैद्यकीय अहवाल व्यवस्थित आहेत. त्या जोखमीच्या माता नव्हत्या. त्या २९ जानेवारी रोजी बँकेत पैसे काढण्यासाठी आल्या. त्यावेळी गर्दी होती. ती दगदग, धावपळ त्यांना सहन झाली नाही. – डॉ. आर. एस. खोकले (निवासी वैद्यकीय अधिकारी, दिंडोरी ग्रामीण रुग्णालय)

Story img Loader