नाशिक : निर्यात शुल्क लागू केल्याने काही काळ नियंत्रणात राहिलेल्या कांदा दराने आवक घटल्यामुळे नव्याने उसळी घेतली आहे. बुधवारी एकाच दिवसांत उन्हाळ कांद्याचे दर प्रति क्विंटलला ५०० ते ६०० रुपयांनी वधारले. देशांतर्गत मागणी कायम असताना आवक कमी होत आहे. नवीन लाल कांदा पूर्ण क्षमतेने बाजारात येईपर्यंत ही स्थिती कायम राहण्याची शक्यता जाणकारांनी वर्तविली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये उन्हाळ कांद्याने हंगामातील सर्वोच्च पातळी गाठली. लासलगाव बाजार समितीत मंगळवारी उन्हाळ कांद्याला क्विंटलला सरासरी ३८०० रुपये दर मिळाले होते. दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी ते ४३५१ रुपयांवर पोहोचले. या दिवशी ६३६४ क्विंटल आवक झाली होती. मनमाड बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याच्या भावाने उसळी घेतली. या बाजारात दरात ५०० रुपयांनी वाढ झाली. इतर बाजार समित्यांमध्येही असेच चित्र होते. कांदा दराने दोन हजाराचा पल्ला ओलांडल्यानंतर ऑगस्टमध्ये केंद्र सरकारने तडकाफडकी निर्यात शुल्क लागू करुन निर्यातीवर अप्रत्यक्ष नियंत्रण आणले होते. त्याचे तीव्र पडसाद शेतकरी व व्यापारी वर्गात उमटले.

हेही वाचा : चाळीत युरिया टाकल्याने कांद्याचे नुकसान- वाखारीतील घटना

जिल्ह्यात कित्येक दिवस बाजार समितीत लिलाव बंद राहिले होते. या निर्णयाचा फेरविचार झाला नाही. उलट देशात कांद्याची उपलब्धता कमी आहे. पावसाअभावी पुढील वर्षी उत्पन्नात घट येईल. अशा स्थितीत उपलब्ध कांदा देशात ठेवणे आवश्यक ठरले. अन्यथा भाव इतके गगनाला भिडतील की, आजवरचे विक्रम मोडीत निघतील, याकडे भाजपच्या मंत्र्यांनी लक्ष वेधले होते.

हेही वाचा : नाशिक: मराठी शाळेची गळचेपी करणाऱ्यांविरोधात मोर्चाची तयारी; रचना विद्यालयाची जागा बळकावण्याचे प्रकरण

सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत काहीअंशी नियंत्रणात राहिलेले दर आता चांगलेच उंचावत आहे. चाळीतील उन्हाळ कांदा संपुष्टात येण्याची वेळ आणि नवीन लाल कांदा पूर्ण क्षमतेने बाजारात येण्याची वेळ यामध्ये जितके अंतर असते, त्याच सुमारास टंचाईमुळे कांद्याचे दर गगनाला भिडतात, असा आजवरचा अनुभव आहे. सध्या तीच स्थिती आहे. मागणी कायम असताना आवक घटली आहे. त्याचा दरावर परिणाम होत असून नव्या कांद्याची आवक तुरळक आहे. दिवाळीनंतर म्हणजे नोव्हेंबरच्या अखेरीस तो पूर्ण क्षमतेने बाजारात येईल. तोपर्यंत ही स्थिती कायम राहण्याची शक्यता लासलगाव बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे यांनी व्यक्त केली. महिनाभर ग्राहकांना कांदा दरवाढीची झळ बसण्याच्या मार्गावर आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nashik price of onion increased by 500 rupees per quintal within a day css