नाशिक : विद्यार्थ्यांसह शिक्षकांचे लक्ष लागून असलेल्या दिवाळी सुट्ट्यांमध्ये जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक विभागात मोठी तफावत आहे. माध्यमिकसाठी १३ दिवस तर, जिल्हा परिषदेकडून प्राथमिक विभागासाठी २१ दिवसांच्या सुट्ट्यांचा उल्लेख पत्रकात करण्यात आला आहे. एकाच जिल्ह्यात प्राथमिक आणि माध्यमिक विभागात दिवाळी सुट्ट्यांमध्ये इतकी तफावत कशी, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
दरवर्षी शासनामार्फत शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच त्या वर्षातील सुट्ट्यांचे वेळापत्रक जाहीर केले जाते. २०२३-२४ या शैक्षणिक वर्षातील सुट्ट्यांविषयी माध्यमिक विभागाचे प्रसिद्धी पत्रक जाहीर झाले असून त्यात सहा ते २१ नोव्हेंबर या कालावधीत दिवाळी सुट्ट्यांचा उल्लेख असून या सुट्ट्या एकूण १३ दिवस आहेत.
हेही वाचा : जुलैतील मूल्यमापनात नाशिक ग्रामीण पोलीस प्रथम, सीसीटीएनएस यंत्रणेतील कामकाज
दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाने २०२३-२४ वर्षासाठी जाहीर केलेल्या पत्रकानुसार सहा ते २९ नोव्हेंबर या कालावधीसाठी दिवाळी सुट्ट्यांचा उल्लेख असून या सुट्ट्या २१ दिवस आहेत. शासनाकडून प्राथमिक आणि माध्यमिक विभागात दिवाळी सुट्ट्यांबाबत भेदभाव करण्यात आल्याची चर्चा रंगली आहे. शासनाने सुट्ट्यांसंदर्भात प्राथमिक आणि माध्यमिक असा भेदभाव करु नये, अशी मागणी शिक्षक संघटनांकडून करण्यात येत आहे.