नाशिक : केंद्र आणि राज्य सरकारच्या युवक आणि क्रीडा विभागातर्फे येथे आयोजित २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो होणार आहे. या महोत्सवाचे बोधचिन्ह आणि शुभंकर चिन्हाचे अनावरण शुक्रवारी केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दृकश्राव्य माध्यमातून करण्यात आले. शुभंकर चिन्ह म्हणून महाराष्ट्राचा राज्यप्राणी ‘शेकरू’ची निवड करण्यात आली आहे.
विकसित भारत २०४७ या संकल्पनेवर आधारीत राष्ट्रीय युवा महोत्सव १२ ते १६ जानेवारी या कालावधीत शहरात होत आहे. महाराष्ट्राला १६ वर्षानंतर ही संधी मिळाली आहे. अयोध्येत राम मंदिराचे उद्घाटन होत असताना रामभूमी नाशिकमध्ये हा महोत्सव होत आहे. अयोध्येत सुरू असलेल्या जय्यत तयारीचा प्रभाव या महोत्सवात दिसणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १२ जानेवारी रोजी युवा महोत्सवाचे उद्घाटन तपोवन येथील मैदानावर होणार आहे. यावेळी हेलिपॅड ते कार्यक्रमस्थळ असा रोड शो होईल. महोत्सवाच्या आयोजनात कुठलीही कमतरता ठेवली जाणार नाही. राज्यातील दीड ते दोन लाख युवक-युवती त्यात सहभागी होतील. न भूतो, न भविष्यती असा हा कार्यक्रम होईल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.
हेही वाचा : भाजपचा बालेकिल्ला भेदण्याचे महाविकास आघाडीसमोर आव्हान
केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी युवा महोत्सवामुळे युवकांना देशात आपला ठसा उमटवू शकण्यासाठी व्यासपीठ मिळते, असे नमूद केले. दरम्यान, पंतप्रधानांच्या रोड शोचा मार्ग कसा असेल हे अद्याप निश्चित झालेले नाही. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कार्यक्रमस्थळालगत हेलिपॅड उभारून रोड शोचे नियोजन करण्यावर प्रशासन विचार करत आहे.
शेकरू शुभंकर चिन्ह
२७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे महाराष्ट्राचा राज्यप्राणी असलेलेे शेकरू हे शुभंकर चिन्ह असणार आहे. महाबळेश्वर, भिमाशंकर व अंबाघाट परिसरात हा प्राणी आढळतो. आकर्षक मखमली रंग व लटकणारी शेपूट असणारा हा देखणा प्राणी आहे. शेकरुचे शुभंकर चिन्ह ॉयुवकांना स्नेह, सामाजिक एकता, गतिशिलता, विविधता आणि पर्यावरणाप्रती आदरभाव हा संदेश देऊन प्रेरणा देईल .असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.