नाशिक : एकलव्य मॉडेल निवासी शाळेत निकृष्ट दर्जाचे भोजन मिळत असल्याने गुरुवारी दुपारपासून इगतपुरी तालुक्यातील शेकडो आदिवासी विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले. कडाक्याच्या थंडीत रात्री उशिरापर्यंत हे विद्यार्थी चांगल्या भोजनाची प्रतीक्षा करीत बसले होते. आंदोलन सुरू असताना आदिवासी विकास विभागातील कोणीही फिरकले नसल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे.
इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील मध्यवर्ती स्वयंपाकगृहातून (सेंट्रल किचन) तालुक्यासह आसपासच्या एकलव्य निवासी शाळेसह शासकीय आश्रमशाळेतील २५ ते ३० हजार विद्यार्थ्यांना भोजन पुरवले जाते. भोजनाच्या दर्जाविषयी विद्यार्थ्यांचे आक्षेप आहेत. एकलव्य शाळेत दिले जाणारे भोजन अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याने विद्यार्थ्यांनी आदिवासी विकास परिषदेकडे तक्रार केली होती. शाळा व्यवस्थापनाकडे दाद मागूनही दखल घेतली गेली नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
हेही वाचा : नाशिकरोड कारागृहातील जमिनीत दोन भ्रमणध्वनी, गुन्हा दाखल
आदिवासी विकास परिषदेचे लकी जाधव यांनी विद्यार्थ्यांना घेऊन ज्या मध्यवर्ती स्वयंपाकगृहातून भोजन दिले जाते, त्याला कुलूप लावण्याची तयारी केली. याची माहिती मिळताच पोलिसांनी सर्वांची समजूत काढली. त्यामुळे विद्यार्थी तिकडे गेले नाही. सकाळचे जेवण दुपारी चार वाजता आले. ते खाण्यायोग्य नव्हते. रात्री उशिरापर्यंत भोजन आले नसल्याची तक्रार जाधव यांनी केली. दूध, फळे वा तत्सम पोषक आहार विद्यार्थ्यांना मिळत नाही. आदिवासी विकास विभाग कोट्यवधींचा निधी खर्च करते. परंतु, विद्यार्थ्यांना चांगले भोजन मिळू शकत नाही, असा आरोप जाधव यांनी केला. तीन वर्षांपासून विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेेला नाही. त्याची चौकशी व्हावी, अशी मागणी जाधव यांनी केली.