नाशिक : नोव्हेबरच्या अखेरीस जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीत ३४ हजार ९५२ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ६२ कोटी ५४ लाख रुपयांची मदत देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने विभागीय कृषी सहसंचालकांमार्फत शासनाकडे सादर केला आहे.
पंचनाम्यांचे काम पूर्ण झाल्यानंतर नैसर्गिक संकटातील पिकांच्या नुकसानीचा अंतिम अहवाल महसूल व कृषी विभागाने तयार केला आहे. त्यानुसार अवकाळीने जिल्ह्यात कोरडवाहू पिकाखालील ५७९० हेक्टर क्षेत्राचे (४.९२ कोटी), बागायत पिकाखालील १४ हजार ५२३ हेक्टर (२४.६९ कोटी) आणि बहुवार्षिक फळपिकाखालील १४३८ हेक्टर (३२.९३ कोटी) असे एकूण ३४ हजार ९५२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांच्या नुकसान भरपाईसाठी ६२.५४ कोटींच्या निधी अपेक्षित असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
अवकाळी पावसाचा १३१६ गावांना फटका बसला. बाधित शेतकऱ्यांची संख्या ६५ हजार ८४९ आहे. कोरडवाहू क्षेत्रासाठी प्रतिहेक्टरसाठी साडेआठ हजार, बागायत क्षेत्रासाठी १७ हजार आणि बहुवार्षिक फळपिक क्षेत्रासाठी २२ हजार ५०० प्रति हेक्टरी या सुधारीत दरानुसार अहवाल तयार करण्यात आल्याचे कृषी विभागाने म्हटले आहे.
हेही वाचा : मोडी लिपीमुळे आव्हान, नाशिकमध्ये ३० हजार मराठा-कुणबी नोंदी पडताळणीचे संकट
द्राक्षाचे सर्वाधिक नुकसान
अवकाळीत १४ हजार ३८० हेक्टरवरील द्राक्ष बागांचे नुकसान झाले. यात निफाडमधील द्राक्ष शेतीला मोठा फटका बसला. या एकाच तालुक्यातील १०६ गावातील साडेसहा हजार हेक्टरवरील द्राक्षांचे नुकसान झाल्याचे अहवालात म्हटले आहे. चांदवड तालुक्यातील १७६६, नाशिक ६३७, सटाणा ११०१, दिंडोरी ३७६२ हेक्टर यासह अन्य भागतही कमी-अधिक प्रमाणात नुकसान झाले. सटाणा तालुक्यात हंगामपूर्व द्राक्षांच्या बागा तयार झाल्या होत्या. काही बागांचे सौदेही झाले होते. त्याआधीच पावसाने सर्व भुईसपाट केले. बहुवार्षिक फळपिकात १६१ हेक्टरवरील डाळिंब, १३.५० हेक्टरवरील मोसंबी, २९.०६ हेक्टरवरील पेरू आणि ३६.६१ हेक्टरवरील अन्य फळपिकांचा समावेश आहे.
हेही वाचा : कंस मामाला लाजवेल असा निर्दयीपणा, धुळ्यात पिंपात बुडवून चार वर्षाच्या बालकाला मारले
बागायती क्षेत्रात ३० हजार शेतकरी बाधित
अवकाळीच्या फेऱ्यातून दोन ते तीन तालुक्यांचा अपवाद वगळता कुठलाही भाग सुटला नाही. दोन दिवसात ११ हजार ५३५ हेक्टरवरील कांदा, ५३ हेक्टरवरील कांदा पिके, तर मका २५१.४५, गहू ११११, टोमॅटो २५१, हरभरा ५७, भाजीपाला व इतर पिके ८६६ तसेच ऊसाचे ३४१ हेक्टरचे नुकसान झाले. बागायत क्षेत्रातील २९ हजार ८३६ शेतकरी बाधित झाले. त्यांच्यासाठी प्रति हेक्टरी १७ हजार यानुसार २४.६९ कोटीची भरपाई मागण्यात आली आहे.
हेही वाचा : नाशिक : नायगाव परिसरात अजून एक बिबट्या जेरबंद
साडेचार हजार हेक्टर भात भुईसपाट
कोरडवाहू पिकाखालील क्षेत्रात ४६७७ हेक्टरवरील भाताचे नुकसान झाले. इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हे बहुतांश क्षेत्र आहे. नागली २५३, वरई ८४, ज्वारी २७३, मका ६५ व इतर ४२६ हेक्टर पिकांचे नुकसान झाले.