नाशिक : मालेगाव शहरातील १५ गरीब, गरजु कुटूंबांना अंत्योदय योजनेचा लाभ आणि पिवळी शिधापत्रिका मिळण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करून देण्याच्या मोबदल्यात २२ हजार रुपयांची लाच स्वीकारताना दहिते येथील धान्य वितरण अधिकारी कार्यालयातील अव्वल कारकूनास अटक करण्यात आली असून मालेगाव कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मालेगाव येथील काही गरजु कुटूंबातील सदस्यांना अंत्योदय योजना आणि पिवळ्या शिधापत्रिकेचा लाभ मिळण्यासाठी ऑनलाईन नोंदणी आवश्यक आहे. त्यासाठी सामाजिक कार्यकर्ते प्रयत्न करत असताना धान्य वितरण कार्यालयातील अव्वल कारकून रवींद्र दहिते याने १५ कुटूंबियांकडून प्रत्येकी १५०० रुपये मागितले. लाचेची ही रक्कम २२ हजार ५०० रुपये ठरली. तडजोडीत २२ हजार रुपये देण्याचे ठरले.
हेही वाचा…नाशिकमध्ये पर्यायी कांदा बाजार सुरू; तरीही शेतकऱ्यांची लूट ?
तक्रारदाराकडून दहिते ही रक्कम स्वीकारत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यास अटक केली. संशयित दहितेविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.