नाशिक: मराठा समाजाच्या आरक्षणासह अन्य मागण्यांची पूर्तता करण्यासाठी शरद पवार यांच्यासह सर्वपक्षीय प्रमुख नेत्यांनी पुढाकार घ्यावा अन्यथा, शरद पवार यांच्या तसेच इतर सर्व नेत्यांच्या घरासमोर उपोषणाला सुरुवात केली जाईल, असा इशारा सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, नाशिक जिल्ह्यातील मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी यात कुठलेही राजकारण न आणता जरांगे यांच्या जिवाशी खेळू नये, समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी ठोस पाऊले टाकावीत, असेही सूचित केले. राजकीय पक्षांच्या प्रमुखांनी पुढे येऊन पाठपुरावा केला पाहिजे. लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या ४८ नवनिर्वाचित खासदारांनी याप्रश्नी लोकसभेत आवाज उठविण्याची गरज आहे. आमदारांनी केवळ पाठिंबा वा फोटोसेशन न करता प्रत्यक्षात ठोस कृती करण्याची आवश्यकता आहे. लोकसभा निवडणुकीनंतर मराठा समाजाच्या प्रश्नांबाबत पवार यांनी पुढाकार घेण्याची मागणी पुढे आली. या संदर्भाताील प्रश्नावर पवार हे राज्यातील ज्येष्ठ नेते असून त्यांनी समाजाला न्याय मिळवून द्यावा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पुढाकार घेऊन प्रामाणिक प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा करण गायकर यांनी व्यक्त केली. राजकीय पातळीवरील प्रतिसादाची काही दिवस प्रतिक्षा केली जाईल. नंतर शरद पवार यांच्या घरासमोर पहिले उपोषण केले जाणार आहे. पाठोपाठ अन्य राजकीय नेत्यांच्या घरासमोर हाच मार्ग अवलंबला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अंतरवली सराटी येथील आंदोलनास ग्रामसभेत ठराव होऊन परवानगी मिळाल्याचा दावा करण्यात आला.

हेही वाचा : नाशिक शिक्षक मतदारसंघात या उमेदवारांचे अर्ज अवैध

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी आत्मपरीक्षण करावे

याआधी सर्व राजकीय पक्षांचे नेते अंतरवली सराटी येथे गेले होते. प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांची भूमिका महाराष्ट्राला कळणे आवश्यक आहे. लोकसभा निवडणुकीत कोणी कोणाचा कार्यक्रम केला हे दिसले. गतवेळी राज्य सरकारने पत्रातून जे आश्वासन दिले, त्याची अमलबजावणी केली नाही. त्यामुळे आमची फसवणूक झाली. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी आत्मपरीक्षण करावे. अजून वेळ गेलेली नाही. लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना फटका बसला की नाही, हे आम्ही सांगणार नाही. सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येऊन मनोज जरांगे यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात, अशी मागणी गायकर यांनी केली.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nashik sakal maratha samaj warns agitation outside the house of sharad pawar for maratha reservation css