नाशिक : अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने भाजपने संपूर्ण देश अयोध्यामय करण्यासाठी जय्यत तयारी सुरु केली असताना शिवसेना ठाकरे गटाने याच सुमारास नाशिकमधून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकण्याची तयारी केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत २३ जानेवारी रोजी शिवसेनेचे राज्यस्तरीय महाशिबीर आणि खुले अधिवेशन येथे होणार आहे.
अयोध्येत राम मंदिराचे उद्घाटन २२ जानेवारी रोजी होत आहे. त्याच्या दुसऱ्या दिवशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी २३ जानेवारी रोजी सकाळी शिवसेना ठाकरे गटाचे राज्यस्तरीय महाशिबीर सातपूर येथील हॉटेल डेमोक्रसी येथे होईल. सायंकाळी त्र्यंबक रस्त्यावरील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर खुले अधिवेशन होणार आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होईल. पूर्वतयारीसाठी रविवारी ठाकरे गटाचे प्रमुख नेते सुभाष देसाई, खा. अरविंद सावंत, खा. संजय राऊत आदींच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. पदाधिकाऱ्यांनी स्थळांची पाहणी केली.
हेही वाचा : नाशिक : सप्तश्रृंग गडावर भाविकांच्या वाहनाचा पेट
शिवसेनेसाठी अयोध्या नवीन नाही. अयोध्येतील आंदोलनात आम्ही सहभागी झालो होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींपेक्षा आम्ही तिथे जास्त वेळा गेलो आहोत. खटल्यात आम्ही आरोपी होतो. मोदी हे निवडून आल्यानंतर अयोध्येला गेले, याकडे खासदार राऊत यांनी लक्ष वेधले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अयोध्येचे आंदोलन झाले होते. मुख्यमंत्री असताना आणि नसताना उद्धव ठाकरे हे अयोध्येत गेले होते. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीचे रणशिंग श्रीरामाच्या भूमीतून फुंकले जावे, राम-रावण युध्द, सत्याचे युध्द या भूमीतून व्हावे, अशी पक्षप्रमुख ठाकरे यांची भावना आहे. शिवसेनेसाठी पंचवटी हेच अयोध्या आहे. म्हणून महाशिबिरासाठी ही जागा निवडण्यात आली. पंचवटीतून लढाईला सुरुवात होईल, असे राऊत यांनी नमूद केले.
हेही वाचा : साहित्य संमेलनाच्या निधीसाठी फिरण्याची गरज; आयोजकांचे समिती पदाधिकाऱ्यांना आवाहन
१९९४ मध्ये याच भूमीत शिवसेनेचे महाअधिवेशन झाले होते. तिथून घुमलेल्या गर्जनेतून शिवसेनेसाठी महाराष्ट्रातील सत्तेचे दरवाजे उघडले गेले होते, असे दाखले देण्यात आले. राम मंदिरासाठी ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी रथ यात्रा काढली होती. आंदोलन पुढे नेले. त्यांनाही राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचे आमंत्रण दिले गेले नाही. यावर भाजप काही बोलत नसल्याचा टोला राऊत यांनी हाणला.