नाशिक : प्रस्तावित पुणे-नाशिक रेल्वे मार्गाच्या मूळ आराखड्यात बदल करत हा मार्ग संगमनेर तालुक्याऐवजी आता शिर्डीमार्गे वळवण्याचे नियोजन केले जात आहे. या मार्गाच्या मूळ आराखड्यानुसार तो संगमनेर तालुक्यातून जाणे अपेक्षित असताना ऐनवेळी हा बदल का केला, असा प्रश्न उपस्थित करत आमदार सत्यजित तांबे यांनी उपरोक्त मार्ग शिर्डीमागे नेण्यास विरोध केला आहे. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांनी भेट घेतली. रेल्वेमार्गाच्या मूळ आराखड्यात कुठलाही बदल न करता तो संगमनेरमधून नेण्याची मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
पुणे-नाशिक या दोन महानगरांना जोडणारा रेल्वे मार्ग महारेलच्या माध्यमातून उभारण्याचा निर्णय सरकारने घेतला. हा मार्ग संगमनेर तालुक्यातून नेण्याचे नियोजन झाले होते. या रेल्वे मार्गामुळे पुण्यातील चाकण, भोसरी आणि नाशिक जिल्ह्यातील सिन्नर आणि मुसळगाव या चार औद्योगिक वसाहती जोडल्या जाणार आहेत. त्यामुळे संगमनेर तालुक्यातील तरुणांना रोजगाराच्या संधी अधिक प्रमाणात उपलब्ध होण्याची शक्यता होती. संगमनेरमधील फळे, भाजीपाला, धान्य हा माल थेट महानगरांमध्ये अधिक जलद पोहोचला असता. तब्बल तीन दशकांनी संगमनेर देशाच्या रेल्वेच्या नकाशावर येणार असल्याने सर्वांनी त्याचे स्वागत केले होते, ही बाब आमदार तांबे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिली.
हेही वाचा : नाशिक शहराचा प्रस्तावित वळण मार्ग विस्तारण्यास अडसर, सिंहस्थ कुंभमेळा नियोजन आढावा बैठक
राज्य सरकारने महारेलच्या माध्यमातून सिन्नर आणि संगमनेर तालुक्यात भूसंपादनही केले आहे. एकट्या संगमनेरमधून १०३ खरेदीखतांद्वारे थेट शेतकऱ्यांकडून जमिनी खरेदी करण्यात आल्या. असे असताना अचानक मार्गात बदल करणे योग्य नाही. मूळ आराखडा बदलून एखादा रेल्वे प्रकल्प अकस्मात दुसऱ्या मार्गाने वळवणे सोपे असते का, याबाबतचा शक्यता अहवाल तपासण्यात आला का, आदी प्रश्न त्यांनी उपस्थित केले. या निर्णयामुळे संगमनेरकरांचे मोठे नुकसान होणार असून जनतेत प्रचंड रोष असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. शिर्डीकडे जाणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या आधीच धावत आहेत. स्वेच्छेने शिर्डीला जाणाऱ्या भाविकांसाठी रेल्वेची सोय आहे. नाशिक-शिर्डी एकमेकांशी जोडलेले आहे. मात्र संगमनेर अद्याप रेल्वेच्या नकाशावर नाही. त्यामुळे आमच्या भागासाठी हा महत्त्वाचा रेल्वेमार्ग आहे. राज्य सरकारने मूळ आराखड्यात बदल न करता हा मार्ग संगमनेरमार्गेच न्यावा, अशी मागणी आमदार तांबे यांनी केली आहे.
हेही वाचा : नाशिकमध्ये आर्थिक वादातून रुग्णालयातच डाॅक्टरवर हल्ला
असा निर्णय का ?
नाशिक-पुणे रेल्वे मार्गामुळे पुण्यातील चाकण, भोसरी आणि नाशिक जिल्ह्यातील सिन्नर आणि मुसळगाव या चार औद्योगिक वसाहती जोडल्या जाणार असल्याने संगमनेरमधील तरुण, शेतकऱ्यांचा फायदा होऊ शकतो. सरकारने महारेलच्या माध्यमातून सिन्नर आणि संगमनेर तालुक्यात भूसंपादनही केले. मूळ आराखडा बदलून एखादा रेल्वे प्रकल्प अकस्मात दुसऱ्या मार्गाने का वळविण्यात येत आहे, असा प्रश्न आमदार तांबे यांनी उपस्थित केला आहे. नाशिक-पुणे रेल्वेमार्ग संगमनेरमार्गे गेल्यास संगमनेर प्रथमच रेल्वेच्या नकाशावर येऊ शकते, याकडेही तांबे यांनी लक्ष वेधले आहे.