नाशिक : शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळातर्फे शेतकरी उत्पादक कंपन्यांना दिलेल्या निधी विनियोगाबाबत महामंडळ अधिकाऱ्यांकडून कंपन्यांची कामे व्यवस्थित सुरू आहेत किंवा नाही, याविषयी तपासणी करण्यात येत असून मार्गदर्शन करण्यात येत आहे. स्थळ तपासणीत ज्या कंपन्यांचे लेखे नियमित नसतील. तसेच ज्या संघटना कार्यशाळेला उपस्थित राहणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड यांनी दिला आहे.

शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळातर्फे वेगवेगळे उपक्रम कायमच आखण्यात येत असतात. आदिवासींच्या कल्याणासाठी कार्यरत असलेल्या या महामंडळाच्या राज्यभरात मुख्य कार्यालयासह १२ शाखा आहेत. राज्यातील आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी १५६ शेतकरी उत्पादक कंपन्यांना निधी वितरण करण्यात आला आहे. या कंपन्यांच्या प्रतिनिधींचे वेळोवेळी प्रशिक्षण आणि कार्यशाळा महामंडळाच्या मुख्यालयात घेण्यात येत असतात. त्यांना व्यवसाय वृद्धीसाठी महामंडळाकडून सर्वतोपरी मदत करण्यात येत असते. या शेतकरी उत्पादक कंपन्या निधीचा विनियोग कसा करतात, खातेवहीचे नियमन आहे का, लेखा अद्यावतीकरण, अंदाजपत्रकात नमूद केलेल्या बाबींनुसार निधीचा विनियोग झाला आहे का, महामंडळाने दिलेल्या कर्जाची परतफेड नियमित आहे का, या गोष्टींची माहिती घेण्यासाठी महामंडळाचे अधिकारी वेळोवेळी स्थळ भेट देत आहेत. स्थळ तपासणीत निधी वितरण केलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांची सद्यस्थिती, खातेवही, लेखापरीक्षण, निधीचा विनियोग, याची खात्री करून त्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. या स्थळ भेटींमुळे कंपन्यांही योग्य कार्यवाहीसाठी सजग राहतील. आदिवासी शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आपल्यावर किती मोठी जबाबदारी आहे, याची जाणीव त्यांना सतत राहील. त्याचा फायदा निधीचा योग्य विनियोग होऊन सर्वांनाच होऊ शकेल. आदिवासी शेतकरी आता आपल्या शेतीत वेगवेगळे प्रयोग करु लागले आहेत. त्यांना योग्य प्रकारचे मार्गदर्शन मिळाल्यास ते शेतीतून अधिक उत्पन्न घेऊ शकतील, त्यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्या एक आशादायक चित्र निर्माण करण्याची शक्यता आहे.

नियमितपणे कार्यशाळा

शबरी महामंडळामार्फत लेखे अद्यावतीकरण कार्यशाळा नुकतीच मुख्यालयात पार पडली. या कार्यशाळा नियमित घेण्यात येणार असून आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी फक्त कर्ज वितरण न करता त्यांचा विनियोग साचेबद्ध पद्धतीने होण्यासाठी महामंडळ कार्यरत आहे.

Story img Loader