नाशिक : गटप्रमुख ते शाखाप्रमुख या पदावर काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी आपली क्षमता व दिलेले काम याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. विजयाने हुरळून न जाता कमी मत मिळालेल्या ठिकाणी आपण मागे का पडलो याचा अभ्यास करा, असा कानमंत्र ठाकरे गटाचे उत्तर महाराष्ट्र समन्वयक रवींद्र मिर्लेकर यांनी दिला.
हेही वाचा : नाशिक: स्वस्त धान्य पुरवठ्यास तांत्रिक बिघाडाचा फटका
नाशिक पश्चिम मतदार संघात गटप्रमुखांचा मेळावा सिडकोतील क्रॉम्प्टन हॉल सभागृहात झाला. मिर्लेकर यांनी मेळाव्यात गटप्रमुखांची उपस्थिती कमी असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. कोणीही न घाबरता पक्षाची ध्येय धोरणे व कामकाज करणे गरजेचे आहे. प्रत्येक शिवसैनिकाच्या पदाला एक जबाबदारी असते, ती जबाबदारी पार पाडणे हे त्याचे कर्तव्य आहे. एकनिष्ठ असलेल्या शिवसैनिकांच्या संपर्कात राहण्याचा सल्लाही मिर्लेकर यांनी दिला. गटप्रमुख हा संघटनेचा पाया आहे. त्यामुळे गटप्रमुखांनी दिलेले काम व्यवस्थितरित्या पार पाडल्यास आपला विजय निश्चित असल्याचे मिर्लेकर यांनी स्पष्ट केले. जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड , डी. जी. सूर्यवंशी, सचिन राणे, देवानंद बिरारी, रमेश उघडे आदी उपस्थित होते