Sanjay Raut on PM Narendra Modi Maharashtra Visit: पंतप्रधान एक है तो सेफ है असा नारा देतात. परंतु, ते जेव्हा जेव्हा येतात, तेव्हा महाराष्ट्र असुरक्षित होतो. राज्यातील उद्योग बाहेर जातो, अशी टीका शिवसेनेचे (उध्दव ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
नाशिक पश्चिम मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर बडगुजर आणि नाशिक मध्यचे उमेदवार वसंत गिते यांच्या प्रचारार्थ शनिवारी येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात राऊत यांनी मार्गदर्शन केले. नाशिक ही कलाप्रेमी, संस्कृती प्रेमींची भूमी आहे. अनेक मौल्यवान रत्न नाशिकने दिले आहेत. परंतु, सध्या शहर अमली पदार्थांच्या विळख्यात सापडले आहे. या विळख्यापासून सुटका करण्यासाठी आणि छोट्या भाभी, बड्या भाभींचा जाच दूर करण्यासाठी, भयमुक्त नाशिकसाठी महाविकास आघाडीला साथ द्या, असे आवाहन राऊत यांनी केले. अमली पदार्थ तयार करण्याचे काम गुजरातमधील एका बंदरावर चालते. हे पदार्थ संपूर्ण भारतात पुरवले जातात, असा आरोपही त्यांनी केला.
आदिवासी पाड्यावर पक्षचिन्ह पोहचण्यात गोंधळ झाला. यंदा हा गोंधळ होऊ नये, यासाठी काळजी घ्यावी लागेल, अशी सूचना राऊत यांनी केली. उमेदवार वसंत गिते यांनी, यंत्रणेवर असलेल्या राजकीय दबावाकडे लक्ष वेधले. छोट्या आणि मोठ्या भाभीचा साथीदार हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत फिरत असताना पोलीस हतबल होऊन पाहत होते, असा आरोपही गिते यांनी केला.