नाशिक: निफाड येथील नांदुर्डी रस्त्यावरील ढेपले वस्तीवर शेततळ्यात बुडून अल्पवयीन भावंडांचा मृत्यू झाला. हे दोघेही वैनतेय विद्यालयात शिकत होते. ढेपले वस्तीवर बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास विहिरीवरील इलेक्ट्रिक मोटर सुरू करण्यासाठी गोपाळ ढेपले यांची प्रेम (१५) आणि प्रतीक (१३) ही दोन्ही मुले गेली होती. बराच वेळ होऊनही मुले का परत आली नाहीत, हे पाहण्यासाठी घरातील मंडळी विहिरीजवळ गेली. परिसरात बिबट्या फिरत असल्यामुळे त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केला की काय, अशी शंका आल्याने जवळपास शोध घेतला असता शेजारील शेतकऱ्याच्या शेततळ्याजवळ एका मुलाचे कपडे त्यांना आढळून आले. सर्वांनी धावपळ करून शेततळ्यात बुडालेल्या दोन्ही मुलांना बाहेर काढले. शेततळे काठोकाठ भरलेले असल्यामुळे मुलांचा जीव वाचविण्याची संधी मिळू शकली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : नाशिक: बँक अधिकाऱ्यांनी गुन्हे तपासात सहकार्य करणे गरजेचे, पोलिसांचे आवाहन

लहान भाऊ प्रतीक हा कपडे काढून आधी तळ्यात उतरला असण्याची शक्यता आहे. त्याला पोहता येत नसल्यामुळे तो बुडायला लागला असता त्याला वाचविण्यासाठी मोठा भाऊ प्रेमने पाण्यात उडी घेतली असावी. दोघांनाही पोहता येत नसल्याने आणि तळ्यातून बाहेर निघण्याची कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे दोघांचाही बुडून मृत्यू झाला असावा, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात दोन्ही बालकांची उत्तरीय तपासणी करण्यात आली. तीनच महिन्यांपूर्वी गोपाळ ढेपले यांचे वडील जयराम ढेपले यांचेही निधन झाले होते.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nashik siblings drowned in farm pond css
Show comments