नाशिक : समाज माध्यमात वादग्रस्त संदेश टाकल्यामुळे संतप्त जमावाने उपनगर पोलीस ठाण्याला घेराव घालत संशयितावर कारवाईची मागणी केली. याच काळात रस्त्यावरील वाहनांवर दगडफेक झाल्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली. पोलिसांनी तातडीने चक्रे फिरवत रात्री एक वाजता संशयिताला अटक केल्यानंतर परिस्थिती निवळली. वादग्रस्त संदेश प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समाजमाध्यमातील वादग्रस्त संदेशाने धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार करत बुधवारी रात्री जमाव आक्रमक झाला. याप्रकरणी गुन्हा दाखल करावा, संशयिताला तत्काळ अटक करावी, अशी मागणी करुन द्वारका, उपनगर आणि दत्तमंदिर चौैकात जमाव रस्त्यावर उतरला. नाशिक-पुणे महामार्गावर उपनगर पोलीस ठाणे आहे. या ठिकाणी रात्री गटागटाने लोक जमा होऊ लागले. एक-दोन तासात या ठिकाणी मोठा जमाव जमा झाला. काहींनी रस्त्यावरील वाहनांवर दगडफेक केली. नाशिकरोडच्या सेंट झेविअर्स शाळेसमोर महामार्गावर जमावाने ठिय्या दिला. वाहतूक ठप्प झाल्यामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या घटनाक्रमाने तणावाची स्थिती निर्माण झाली.
हेही वाचा : आजपासून नाशिकमधील बाजार समित्यांमधील लिलाव बंद; हमाली, तोलाई वाद
पोलीस उपायुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव, उपायुक्त मोनिका राऊत, डॉ. सचिन बारी आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी धाव घेत परिस्थिती हाताळली. जमावाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, कुणी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. संशयिताला अटक करून आमच्या ताब्यात द्यावे, अशी मागणी केली जात होती. पोलिसांनी तातडीने चक्रे फिरवत रात्री एक वाजता संशयिताला अटक केली. त्याची माहिती जमावाला दिल्यानंतर परिस्थिती निवळली, असे पोलीस उपायुक्त बच्छाव यांनी सांगितले.
हेही वाचा : नाशिक: सुरगाण्यात स्थानिक गुन्हे शाखेचा जुगार अड्ड्यावर छापा
दगडफेकीत पोलिसांच्या वाहनांसह काही गाड्यांचे किरकोळ नुकसान झाले. पोलिसांनी संशयिताला अटक केल्याची चित्रफित सादर केल्यानंतरही काही जण ऐकायला तयार नव्हते. रात्री उशिरा त्यांची समजूत काढल्यानंतर त्यांना घरी पाठविण्यात आले. परिस्थिती हाताळण्यासाठी दंगा नियंत्रण पथकासह मोठी कुमक या भागात तैनात केली होती.