नाशिक: जीवे मारण्याचा प्रयत्न करून दोन महिन्यांपासून फरार असलेल्या संशयिताला गुंडा विरोधी पथकाने ताब्यात घेतले आहे. शहरात अक्षय केदार यास सुरेश खंडारे, यश गरूड, यश दंडगव्हाळ २२, रा. दसक) यांनी जुन्या भांडणाची कुरापत काढून सळई, धारदार शस्त्राने वार केले. डोक्यावर, कमरेवर आणि हाताला मार बसल्याने अक्षय बेशुध्द झाला. त्याला नाशिकरोड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. गुंडाविरोधी पथकाने या गुन्ह्याची दखल घेत तपास सुरू केला.
हेही वाचा : नाशिक : खड्ड्यांविरोधात मनसेचे ढोल वाजवून मडके फोड आंदोलन
गुन्हा घडल्यापासून संशयित यश दंडगव्हाळ फरार होता. ओळख लपवत आणि पेहराव बदलून यश हा शहरातच फिरत होता. यश हा उपनगर परिसरात येणार असल्याची माहिती गुंडा विरोधी पथकाला मिळाल्यानंतर पथकाने सापळा रचत यश याला त्याच्या घराच्या परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता धारदार शस्त्राने वार करुन मारहाण केल्याची कबुली दिली. संशयिताला उपनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.