नाशिक: नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या छाननी प्रक्रियेत दोन उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले तर ३६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. शिवसेना (शिंदे गट) उमेदवार किशोर दराडे यांच्या शपथपत्रात दाखल गुन्ह्याबाबत पूर्ण माहिती दिली नसल्याचा आक्षेप फेटाळून त्यांचा अर्ज वैध ठरविण्यात आला.

उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली. या निवडणुकीसाठी ३८ उमेदवारांनी ५३ अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ३६ उमेदवारांचे अर्ज वैध आणि दोन उमेदवारांचे अर्ज अवैध ठरल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिली. अमोल दराडे आणि सारांश भावसार यांचे वय ३० वर्षापेक्षा कमी असल्याने त्यांचे अर्ज अवैध ठरले आहेत. शिवसेना (शिदे गट) उमेदवार किशोर दराडे यांच्या शपथपत्राबाबत उमेदवार रणजित बोठे यांच्या प्रतिनिधींनी आक्षेप घेतला होता. दराडे यांनी शपथपत्रात गुन्ह्यांबाबत पूर्ण माहिती दिलेली नसल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरविण्याची मागणी केली होती. तो कायदेशीर तरतुदीनुसार फेटाळण्यात आला. माघारीसाठी १२ जूनपर्यंत मुदत आहे.

हेही वाचा : नाशिक जिल्ह्यातील धरणसाठा आठ टक्क्यांवर

विक्रम कुमार निवडणूक निरीक्षक

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्या अनुषंगाने शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचे निवडणूक निरीक्षक म्हणून विक्रम कुमार यांची नियुक्ती निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे. विक्रम कुमार यांच्याशी ९८२२४ ६२५२३ व ०२५३- २९९९०८२१ या क्रमांकावर संपर्क साधावा.