नाशिक: प्रलोभने, उमेदवारांच्या नावात साधर्म्य, महायुतीतील बिघाडी, बनावट मतदार आक्षेप अशा विविध कारणांनी गाजलेल्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतमोजणीत तीन केंद्रांवर मतदान झालेल्या नोंदीपेक्षा पाच मतपत्रिका अधिक आढळल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली. या मतपेट्या तुर्तास बाजुला ठेवून मतमोजणी सुरू करण्यात आली.
अंबड येथील वखार महामंडळाच्या गोदामात ही मतमोजणी होत आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघात ९३.४८ टक्के मतदान झाले. ६९ हजार ३६८ पैकी ६४ हजार ८४८ मतदारांनी मतदान केले होते. शिवसेनेचे (शिंदे गट) किशोर दराडे, शिवसेना ठाकरे गटाचे ॲड. संदीप गुळवे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महेंद्र भावसार, भाजपशी संबंधित अपक्ष विवेक कोल्हे यांच्यासह एकूण २१ उमेदवार रिंगणात आहेत. सकाळी आठ वाजता ३० टेबलवर मतमोजणीची प्रक्रिया सुरू झाली. पहिल्या टप्प्यात प्रत्येक केंद्रावरील मतपत्रिका मोजल्या जातात. त्यांचा हिशेब जुळवला जातो. ५० मतपत्रिकांचे गठ्ठे करून नंतर एक हजार मतपत्रिका प्रत्येक टेबलवर दिल्या जातात. याच प्रक्रियेत चोपडा तालुक्यातील केंद्रावर नोंदविल्या गेलेल्या मतदानापेक्षा तीन, निफाड व येवला केंद्रावरील मतपेटीत प्रत्येकी एक अशा एकूण पाच मतपत्रिका जास्त आढळून आल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी सांगितले. यावर ठाकरे गटाने आक्षेप घेतला. जादा मतपत्रिकांची चौकशी करण्याची मागणी केली. काही काळ मतमोजणी थांबली. या संदर्भात चौकशी केली जाईल असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. या मतपेटी बाजुला ठेऊन मतमोजणी सुरू करण्यात आली.
हेही वाचा : पाठलागानंतर दोन तरुणांकडून तीन गावठी बंदुका हस्तगत
निकालास रात्र होण्याची शक्यता
मतदान यंत्रावरील (इव्हीएम) मतमोजणी आणि कागदी मतपत्रिकेवर पसंतीक्रमानुसारची मोजणी यात कमालीचा फरक आहे. त्यामुळे अन्य निवडणुकीच्या तुलनेत या निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यास रात्र होण्याची शक्यता आहे. . मतदारांनी मतदान कसे केले, यावर मतमोजणीचा कालावधी अवलंबून असतो. या निवडणुकीत २१ उमेदवार होते. मतदारांना एक ते २१ पर्यंतचे पसंतीक्रम नोंदवण्याची मुभा होती. प्रारंभी मतमोजणीत पहिल्या पसंतीची मते मोजली जातात. त्यावेळी मतदान विहित निकषानुसार नसल्यास मतपत्रिका अवैध ठरतात. या टप्प्यात वैध मतांची स्पष्टता होते. विजयासाठी वैध मते भागिले दोन. यातून जी संख्या येईल त्यात अधिक एक असा मतांचा कोटा होतो. हा कोटा उमेदवाराला मिळत नाही, तोपर्यंत विजयी झाल्याचे घोषित केले जात नाही. पहिल्या पसंतीक्रमात हा कोटा कुणीही न गाठल्यास दुसऱ्या पसंतीची मते मोजावी लागतात. म्हणजे कमी मतदान झालेल्या उमेदवाराला बाद करून त्याच्या मतपत्रिकेतील दुसऱ्या क्रमांकाची मते मोजून ती उमेदवारांकडे हस्तांतरीत होतात. दुसऱ्या पसंतीक्रमानुसारच्या मतमोजणीत कोटा गाठला गेला नाही तर याच पद्धतीने पुढील पसंतीक्रमानुसार मोजणी केली जाते. अशा परिस्थितीत रात्री उशिरा वा पहाटेपर्यंत मतमोजणी प्रक्रिया चालू शकते, असे निवडणूक यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.