नाशिक – देवळाली गावात शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटात झालेल्या वादात एकाने हवेत गोळीबार केल्याने वातावरण तणावपूर्ण झाले. दोन्ही गटाचे समर्थक तलवारी, कोयते, लाठ्या-काठ्या घेऊन परस्परांच्या अंगावर धाऊन गेले. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. गुरूवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिवजयंतीच्या नियोजनासाठी देवळाली गावातील गणपती मंदिराजवळ सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. शिवजयंती उत्सव समितीवर शिंदे गटात सहभागी झालेल्या लवटे गटाचे वर्चस्व आहे. या बैठकीचे निमंत्रण एका गटाला दिले नसल्यावरून वादाची ठिणगी पडली. अलीकडेच ठाकरे गटात प्रवेश केलेले माजी नगरसेवक भैय्या मणियार आणि लवटे समर्थकांमध्ये संघर्ष उफाळून आल्याचे सांगितले जाते. दोन्ही गटाचे समर्थक तलवारी, लाठ्या-काठ्या घेऊन परस्परांवर चालून गेले. यावेळी हवेत गोळीबार झाल्याचे सांगितले जाते. या घटनाक्रमाने परिसरात धावपळ उडाली. दुकाने बंद झाली.

हेही वाचा – “बंडखोरांच्या पाठिशी उभं राहणार नाही” या नाना पटोलेंच्या वक्तव्यावर सत्यजीत तांबेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, म्हणाले…

पोलिसांनी दोन्ही गटांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुणी ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने अतिरिक्त कुमक मागवली गेली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. देवळाली गाव, नाशिकरोड परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. या भागांत दंगा नियंत्रण पथक तैनात करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दोन गटांतील वादात हवेत गोळीबार झाला असून संशयितास ताब्यात घेण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले. पोलिसांकडून अन्य संशयितांची धरपकड सुरू आहे. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम प्रगतीपथावर आहे.

हेही वाचा – नाशिक : शस्त्रासह समाजमाध्यमात चित्रफित टाकणे महागात; दोघांना अटक

देवळाली कॅम्प, नाशिकरोड परिसर शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. या भागांतही शिवसेनेत दोन गट पडले आहेत. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांकडून वर्चस्व राखण्याची धडपड सुरू आहे. त्यातून उभय गटांतील संघर्ष शिगेला पोहोचण्याची चर्चा आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nashik thackeray shinde group dispute firing in the air ssb