नाशिक : लग्नास नकार दिल्याने ओझर येथील युवतीवर कात्रीने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी सागर गायकवाड या आरोपीस निफाड येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश बी. डी. पवार यांनी पाच वर्ष कठोर तुरुंगवासासह ५४ हजार ५०० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. ओझर येथील १८ वर्षाची युवती आणि तिच्या आई-वडिलांनी लग्नास नकार दिल्याचा राग मनात धरून सागर गायकवाडने ही युवती कामावरून घरी जात असताना तिच्यावर शिवण कामाच्या कात्रीने वार करून मारण्याचा प्रयत्न केला. तसेच तिच्यासोबत असलेल्या तक्रारदार महिलेस जखमी केले होते. या प्रकरणी ओझर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या खटल्याची सुनावणी निफाड येथील जिल्हा व सत्र न्यायालयात झाली. या प्रकरणात न्यायालयाने सागर गायकवाडला दोषी ठरवले.
हेही वाचा…नाशिक जिल्ह्यात दुष्काळाची छाया गडद, ४३६ गाव वाड्यांना टँकरने पाणी
जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. डी. पवार यांनी आरोपीला पाच वर्षे तुरुंगवास, ५० हजार रुपये दंड व दंड भरल्यास तीन महिने तुरुंगवास अशी शिक्षा सुनावली. न्यायालयाने ५४ हजार ५०० रुपये दंड ठोठावला असून त्यातील ५० हजार रुपये पीडितेस द्यावेत, असे आदेशात म्हटले आहे. खटल्यात जिल्हा सहायक सरकारी अभियोक्ता एस. पी. बंगले यांनी सरकार पक्षातर्फे कामकाज पाहिले.