नाशिक: उन्हाची तीव्रता प्रचंड वाढत असल्याने जिल्ह्यातील धरणसाठा कमी होत आहे. जिल्ह्यातील सर्व २४ धरणांमध्ये सध्या २२ हजार ७५ दशलक्ष घनफूट अर्थात ३३ टक्के जलसाठा आहे. माणिकपुंज हे धरण कोरडेठाक झाले असून अन्य आठ धरणांमध्ये २० टक्क्यांहून कमी जलसाठा असून ती रिक्त होण्याच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहेत.
मागील पावसाळ्यात जिल्ह्यात समाधानकारक पर्जन्यवृष्टी झाली. त्यामुळे धरणांसह लहान-मोठे तलाव, बंधारे भरलेले होते. या एकंदर वातावरणात पाणी टंचाईची फारशी तीव्रता भासणार नसल्याचे वाटत होते. परंतु, मार्चनंतर पारा चढला, तसे अनेक भागात टंचाईचे चटके बसू लागले. धरणातील पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग देखील वाढला.
एप्रिल महिन्यात तापमानाने सर्वोच्च पातळी गाठली. कित्येक दिवस पारा ४० अंशांच्या पुढे राहिला. उष्णतेची लाट अनेक दिवस कायम राहिली. सद्यस्थितीत एप्रिलच्या अखेरीस धरणांमध्ये गतवर्षीच्या तुलनेने १० टक्के अधिक जलसाठा आहे. परंतु, तेव्हा दुष्काळी स्थिती होती. धरणेही पूर्ण क्षमतेने भरली नव्हती. गतवर्षी एप्रिलच्या अखेरीस धरणांमध्ये १५ हजार २६ दशलक्ष घनफूट म्हणजे २२ टक्के जलसाठा होता.
प्रशासनाच्या माहितीनुसार पालखेड धरणात १६३ दशलक्ष घनफूट (२४ टक्के), ओझरखेड ५२३ (२४), दारणा २९५४ (४१ टक्के), भावली ३९९ (२७), मुकणे ३३५१ (४६), वालदेवी ५१४ (४५), नांदुरमध्यमेश्वर ८४ (३२ टक्के). चणकापूर ७८१ (३२), हरणबारी ४५१ (३८), केळझर १८८ (३२), गिरणा ५३४६ (२८), पुनद धरणात ९२७ दशलक्ष घनफूट म्हणजे ५६ टक्के जलसाठा आहे.
गंगापूरमध्ये ५५ टक्के पाणी
नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात तीन हजार १३६ दशलक्ष घनफूट (५५ टक्के) जलसाठा आहे. या समूहातील काश्यपीत १३९१ (७५ टक्के), गौतमी गोदावरी १७२ ( नऊ टक्के), आळंदी १८७ (२२ टक्के) जलसाठा आहे. मागील वर्षी याच काळात गंगापूरमध्ये ४१ टक्के जलसाठा होता. तेव्हा पाणी कपातीची गरज महापालिकेने मांडली होती. निवडणूक वर्षात तसा निर्णय घेण्यास राजकीय मंडळींनी विरोध केला. यंदा गतवेळच्या तुलनेत १४ टक्के अधिक जलसाठा असल्याने तसा विचार करावा लागणार नसल्याचे सांगितले जाते.
कमी जलसाठा असणारी धरणे
माणिकपुंज हे धरण कोरडेठाक पडले असून गौतमी गोदावरी (नऊ टक्के), करंजवण (१६), वाघाड (आठ टक्के), पुणेगाव (दोन), तिसगाव (नऊ), कडवा (१८ टक्के), भोजापूर (एक टक्का), नाग्यासाक्या (नऊ टक्के) या आठ धरणात एक ते २० टक्क्यांदरम्यान जलसाठा आहे.