नाशिक : कळवण तालुक्यात शेतीपंप चोरीचे प्रकार वाढले आहेत. कळवण पोलीस ठाण्यात यासंदर्भात येणाऱ्या तक्रारींची दखल घेत गुन्हे दाखल होताच पोलिसांनी पाच जणांना अटक करुन मुद्देमाल हस्तगत केला आहे. कळवण तालुक्यातील नाकोडा, पाटविहीर, बेजसह परिसरात रात्री अंधाराचा फायदा घेत शेतीपंप आणि अवजारे, शेतीपयोगी इतर साहित्य चोरण्याचे प्रकार वाढले आहेत. नाकोडा येथील शेतकरी गंगाधर गुंजाळ यांच्यासह काही शेतकऱ्यांनी कळवण पोलिसात यासंदर्भात तक्रार दिल्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन चोरांच्या तपासणीसाठी प्रयत्न सुरु केले.
हेही वाचा : मधमाश्यांच्या हल्ल्यात वृध्दाचा मृत्यू, धुळे तालुक्यातील घटना
पोलीस निरीक्षक खगेंद्र टेभेंकर यांच्या नेतृत्वाखाली दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात सामील जुनीबेज (ता. कळवण) येथील तुषार पवार (२०), राकेश पवार (२२), अक्षय पवार (२१) यांना ताब्यात घेऊन इलेक्ट्रिक कृषी मोटर, विवेक सहाणे (२१), रवींद्र पवार (१९) यांचेकडून शाळेची जुनी कागदपत्रे, जुन्या पुस्तकांची रद्दी, लोखंड, पत्र्याचे तुकडे, चारा कापण्याचा लोखंडी अडकित्ता, सात लोखंडी अँगल असा १३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. ही कामगिरी निरीक्षक टेभेंकर, उपनिरीक्षक बबनराव पाटोळे यांसह विठ्ठल बागूल, बोंबले, पंकज शेवाळे, संदिप बागूल, संदिप गांगुर्डे, नितीन वाघमारे, कृष्णा गवळी, अनिल बहिरम यांनी केली.