नाशिक : चांदवड शहरातील राजे छत्रपती शिवाजी महाराज चौकातील भारतीय स्टेट बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न मंगळवारी पहाटे करण्यात आला. एटीएम नव्या पध्दतीचे असल्याने चोरांना ते फोडता आले नाही. या प्रकरणी चांदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चांदवड येथील शिवाजी महाराज चौकात भारतीय स्टेट बँकेचे एटीएम आहे. एटीएम सुरक्षेसाठी बँकेने सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास एका चारचाकी वाहनातून आलेल्या चार ते पाच चोरांनी एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. एटीएम नव्या पध्दतीचे असल्याने त्यांना वेळ लागत होता. त्याच वेळी दूध डेअरीची गाडी आल्याने चोरट्यांना हाती काही न लागता एटीएममधून पळ काढावा लागला.
हेही वाचा : अमली पदार्थ विरोधी जनजागृतीतून विरोधकांना प्रत्युत्तर, दादा भुसे यांच्या उपस्थितीत आज बैठक
या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक कैलास वाघ, सहायक निरीक्षक रवींद्र जाधव यांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला, मनमाडचे पोलीस उपअधीक्षक सोहेल शेख, नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील हेही घटनास्थळी पोहचले. एटीएम केंद्र तसेच बाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रणाच्या माध्यमातून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.