नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावर रात्रीच्या वेळी प्रवासी वाहनांवर कोयत्याने हल्ला करुन लूटमार करणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात नाशिक ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून ९७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नववर्षाच्या सुरूवातीला मुंबई-आग्रा महामार्गाने मित्रांसमवेत वाहनातून जात असताना मुंढेगाव शिवारात ठाणे येथील किरण कावळे हे काही वेळासाठी थांबले होते. त्यावेळी तीन संशयितांनी कारची काच फोडून कोयत्याचा धाक दाखवत त्यांच्याकडील सोन्याची साखळी, भ्रमणध्वनी आणि रोख रक्कम असा ७०,५७० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. घोटी पोलीस ठाण्यात याविषयी गुन्हा दाखल करण्यात आला होता. दादर येथील नवीनकुमार जैन यांच्याबाबतही १३ जानेवारी रोजी असाच प्रकार घडला. वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात याविषयी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हेही वाचा : नाशिक-बोरीवली मार्गावर बुधवारपासून इलेक्ट्रिक बससेवा
नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी या लुटमारीचा आढावा घेत स्थानिक गुन्हे शाखेस तपासाच्या सूचना दिल्या. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजू सुर्वे यांच्या पथकाने संशयितांची गुन्हा करण्याची पध्दत, गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकी, यावरून तपासाची दिशा निश्चित केली. पथकाने नाशिक शहरातील नानावली, द्वारका तसेच उपनगर परिसरात सतत पाळत ठेवत तौसिफ लुकमान पठाण उर्फ गफुर बस्ती (३०, रा. नानावली), प्रवीण उर्फ चाफा काळे (२४, रा. आम्रपाली झोपडपट्टी) यांना ताब्यात घेतले. त्यांची सखोल चौकशी केली असता मोहम्मद सय्यद (रा. नानावली) याच्यासह मागील महिन्यात दुचाकीने जात मुंबई-आग्रा महामार्गावर जबरी चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी ताब्यात घेतलेले तौसिफ आणि प्रवीण यांच्याकडून जबरीने चोरलेले विविध कंपन्यांचे भ्रमणध्वनी, गुन्ह्यात वापरलेली निळ्या रंगाची दुचाकी तसेच पिवळ्या धातूची साखळी असा ९७ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. मोहम्मद हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
हेही वाचा :नाशिक : अन्न औषध प्रशासनाला लवकरच मनुष्यबळ उपलब्ध, फिरत्या प्रयोगशाळांचाही उपक्रम
सोनसाखळी ओरबाडणारे ताब्यात
पाणी बाटली विकत घेण्याच्या बहाण्याने दुकानात येवून सोनसाखळी ओरबाडून पलायन करणाऱ्या दोन संशयितांना नाशिक तालुका पोलिसांनी अवघ्या २४ तासात ताब्यात घेतले. छबुबाई वाघ यांची चहा टपरी आहे. त्यांच्या दुकानात दोन संशयित आले. पाण्याची बाटली विकत घेत पैसे दिले. त्यानंतर दुपारी पुन्हा दुचाकीने येत पाण्याची बाटली विकत घेतली. यावेळी ऑनलाईन पैसे दिले. पैसे जमा झाले का, हे त्यांनी वाघ यांना पाहण्यास सांगितले. तेव्हा वाघ यांनी भ्रमणध्वनीवर मुलाशी संपर्क केला. संशयितांनी या संधीचा फायदा घेत त्यांच्या गळ्यातील पोत आणि सोन्याचे पदक अशी ३५ हजार रुपयांची सोनसाखळी हिसकावून पोबारा केला. नाशिक तालुका पोलिसांनी साक्षीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार ध्रुवनगर परिसरातून सागर देवरे (२४, रा. शिवाजीनगर), चंदर फसाळे (२७, रा. लाडची) यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून सोन्याची पोत व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.