नाशिक: आदिवासी विकास विभागातील रोजंदारी कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य रोजंदारी तृतीयश्रेणी आणि चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा बिऱ्हाड मोर्चा नाशिकहून विविध मागण्यांसाठी मुंबईकडे निघाला असून शुक्रवारी सकाळी मोर्चेकऱ्यांनी कसारा घाटात अचानक रास्ता रोको केल्यामुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

मानधनवाढ, सेवा सुरक्षा, सरसकट समायोजन यासह इतर मागण्यांसाठी बिऱ्हाड मोर्चा मुंबईकडे निघाला आहे. १२ जून रोजी सकारात्मक चर्चा झाल्याने मोर्चा स्थगित करण्यात आला होता. परंतु, १० दिवस उलटूनही सरकारने कोणताही निर्णय न घेतल्याने भरपावसात मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चात शेकडोंच्या संख्येने महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आलेले कर्मचारी सहभागी झाले असून मागण्या मान्य न झाल्यास मंत्रालयासमोर आत्मदहन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचा : नाशिक: दुष्काळात पाण्याचा अपव्यय; काश्यपीतील विसर्ग निम्म्यावर, वहनव्यय वाढणार

नाशिकहून मुंबईच्या दिशेने भरपावसात निघालेल्या बिऱ्हाड मोर्चाने गुरुवारी कसारा घाटाजवळील घाटनदेवी येथे मुक्काम ठोकला होता. शुक्रवारी कसारा घाटातील मुंबईकडे जाणाऱ्या आणि मुंबईहून येणाऱ्या अशा दोन्ही मार्गांवर ठिय्या देत बिऱ्हाड मोर्चाने आंदोलन सुरू केले. आंदोलनामुळे दोन्ही मार्गांवर वाहतूक कोंडी होऊन दोन ते तीन किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. काही वेळानंतर मोर्चेकऱ्यांनी पुढे जाणे सुरु केले.