नाशिक: आदिवासी विकास विभागाकडून स्लॅम आउट लाऊड (एसओएल) आणि गर्ल रायझिंग या संस्थांच्या सहकार्याने आश्रमशाळांच्या प्रवेशित विद्यार्थ्यांमधील सामाजिक-भावनिक शिक्षणाचा स्तर वाढविण्यासाठी ”अभिव्यक्ती” हा नाविन्यपूर्ण प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांना कथाकथन, नाट्य, कविता आणि दृश्य कला या माध्यमातून शैक्षणिक धडे दिले जाणार आहेत.
राज्यात आदिवासी विकास विभागाच्या ४९७ शासकीय आश्रमशाळा असून, त्यामध्ये सुमारे दोन लाख विद्यार्थी प्रवेशित आहेत. या विद्यार्थ्यांच्या सामाजिक-भावनिक शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे आणि आयुक्त नयना गुंडे यांच्या पुढाकाराने ”अभिव्यक्ती” प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. त्यासाठी कलेवर आधारित अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या वर्षी १० हजार विद्यार्थी, २०० शिक्षक आणि ४० एसईएल चॅम्पियन्सपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. दरम्यान, ”अभिव्यक्ती”द्वारे आदिवासी विद्यार्थ्यांना सामाजिक-भावनिक शिक्षणाच्या तत्वांबरोबरच हवामान बदल तसेच किशोरवयीन मुलांमधील भावनिक जागरूकता आणि विश्लेषणात्मक विचार यासारख्या महत्त्वपूर्ण कौशल्यांसह सक्षम बनविले जाणार आहे. लैंगिक समानतेची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे.
हेही वाचा : वंचितच्या नांदगाव माजी तालुकाध्यक्षांना माघारीसाठी धमकी
u
शिक्षकांना दोन दिवसीय प्रशिक्षण
नाशिक अपर आयुक्तालयातील शिक्षकांना अभिव्यक्ती प्रकल्पाअंतर्गत दोन दिवसीय प्रशिक्षण देण्यात आले. नागपूर, ठाणे आणि अमरावती विभागांमध्येही प्रशिक्षण दिले जाणार आहे. दरम्यान, अभिव्यक्ती’मध्ये शिक्षकांना सामावून घेण्यात आले असून, त्यांना प्रशिक्षित केले जात असल्याचे स्लॅम आऊट लाऊडच्या नेहा राठी यांनी सांगितले. सामाजिक-भावनिक शिक्षणामुळे आदिवासी समुदायामध्ये कायमस्वरूपी सकारात्मक बदल होईल, अशी अपेक्षा गर्ल रायझिंगच्या रिचा हिंगोरानी यांनी व्यक्त केली.
अभिव्यक्ती प्रकल्प हा आश्रमशाळांमधील सामाजिक-भावनिक शिक्षणात परिवर्तन करण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल असणार आहे. हवामान बदल, लैंगिक समानता यासारख्या गंभीर मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. हा प्रकल्प शालेय शिक्षण क्षेत्रातील सकारात्मक बदलांसाठी दिशादर्शक ठरणार आहे.
नयना गुंडे (आयुक्त, आदिवासी विकास विभाग)
–
© The Indian Express (P) Ltd