नाशिक : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहाच्या आवारात जमिनीत पुरलेले दोन भ्रमणध्वनी आढळले. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुध्द नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सतत चर्चेत असलेले नाशिकचे मध्यवर्ती कारागृह पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. संरक्षण भिंती आणि सुरक्षा यंत्रणा असतानाही कारागृहाच्या आवारात दोन भ्रमणध्वनी आढळल्याने खळबळ उडाली आहे. याआधीही असे प्रकार घडले आहेत. कारागृहात काम करणाऱ्या हिरालाल भामरे यांना आवारातील सर्कल दोनमधील बराक क्रमांक आठच्या परिसरात खोदून ठेवलेल्या ठिकाणची माती बाजूला केली असता प्लास्टिक पिशवीत लाल व काळ्या रंगाचे दोन साधे भ्रमणध्वनी मिळाले.

हेही वाचा : नाशिक : मिशन भगीरथ प्रयासमुळे भूजल पातळीत वाढ, काठीपाडा परिसरास लाभ

याविषयी नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक गिरी यांनी, याआधीही अशा घटना घडल्या असल्याचे सांगितले. सुरक्षा व्यवस्था असताना असे सामान आतमध्ये जाते कसे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. कारागृहातील कोणीतरी या सर्वांना सामील असून या अनुषंगाने सर्वांची चौकशी होईल, असे गिरी यांनी नमूद केले.

Story img Loader