मनमाड : चांदवड ते मनमाड मार्गावर दुचाकी मालमोटारीखाली सापडून दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीमधून आलेल्या मोकाट जनावरांमुळे हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अल्पवयीन मुलाच्या हाती दुचाकी देणे जिवावर बेतले. चांदवड-मनमाड मार्गावर सोमवारी दुपारी हा अपघात झाला. या मार्गालगत दरेगाव रस्त्यावर स्वामी विवेकानंद शाळा आहे. शाळा सुटल्यामुळे विद्यार्थी घरी निघाले होते. आदित्य सोळसे (१६) आणि वैष्णवी केकाण (१६, दोघेही रा. हनुमाननगर) दुचाकीने घरी निघाले होते. आदित्य दुचाकी चालवत होता. बाजार समितीच्या प्रवेशद्वारातून मोकाट जनावरांची झुंड आली. अचानक गायी रस्त्यावर आल्याने मालमोटार आणि दुचाकीचा अपघात झाल्याचे सांगितले जाते. दुचाकीवरील दोन्ही मुले मालमोटारीखाली सापडली. त्यांचा जागीच मृत्यू झाला. मोकाट जनावरांमुळे हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगितले जाते. दोन्ही विद्यार्थी येथील स्वामी विवेकानंद विद्यालयात इयत्ता १० वीत होते. दोन्ही विद्यार्थी अल्पवयीन आहेत. दोन्ही विद्यार्थ्यांच्या घरची परिस्थिती साधारण आहे. आदित्य हा हनुमाननगर येथे मामाच्या घरी राहत होता. त्याचे आई-वडील हे छत्रपती संभाजीनगर येथे आहेत. पोलिसांनी मालमोटारीसह चालक दादाजी खैरनार (कौळाणे, मालेगाव) यांना ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा : नाशिक : उघड्या रोहित्रामुळे अल्पवयीन मुलाचा मृत्यू

मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर

मनमाड शहरात काही वर्षांपासून मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मोकाट जनावरांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून यामुळे नागरिकांना मोठा त्रास होत आहे. रस्त्याने मोकाट जनावरे पळू लागले की, सर्वांची एकच तारांबळ होते. काहीवेळा जनावरांनी धडक देण्याच्या घटना घडल्या आहेत. दोन बैलांची झुंज झाल्यास भर बाजारपेठेत धावपळ उडते. अनेकदा दुचाकींचे नुकसान होते. काही वेळा झुंजीत सापडल्यास अपघात होऊन काहींना अपंगत्व आले आहे. मोकाट जनावरे रस्त्याच्या मधोमध ठाण मांडतात. रहदारीस अडथळा निर्माण होतो. महामार्गावर मोकाट जनावरे रस्ता अडवून उभे राहत असल्याने अनेकदा वाहतूक कोंडी होते. सोमवारचा अपघात मोकाट जनावरांमुळे होऊन विद्यार्थ्यांना आपला जीव गमवावा लागल्याचे सांगितले जाते.

Story img Loader