नाशिक : कर्ज आहे, पण ते फेडण्याची ताकद देशात आहे. जितका अधिक पैसा वितरणात जात नाही, कामे होत नाहीत, तोपर्यंत विकास होत नाही. मागील अर्थसंकल्पात भांडवली खर्चासाठी ११ लाख कोटींची तरतूद झाली होती. त्याच्या तीनपट रोजगार व उत्पन्न वाढत आहे. त्यामुळे सरकार कर्ज घेत असले तरी त्यातून विकास साधला जातो, असे दाखले देत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी जितके जास्त कर्ज, तितका विकास असेच जणूकाही समीकरण अधोरेखीत केले.
येथे एका कार्यक्रमानिमित्त आलेले डाॅ. कराड यांनी पत्रकारांशी संवाद साधताना अमेरिका आणि चीनपेक्षा देशात महागाई कमी असल्याचे सांगितले. वारंवार विचारणा करूनही देशावरील कर्जाचा नेमका आकडा मात्र त्यांनी उघड केला नाही. मोदी सरकारच्या कार्यकाळात देशाच्या अर्थव्यवस्थेत लक्षणीय सुधारणा झाली. जगात २०१४ मध्ये १० व्या क्रमांकावर असणारी भारताची अर्थव्यवस्था आज पाचव्या क्रमांकावर आली आहे. ज्या ब्रिटिशांनी भारतावर दीडशे वर्षे राज्य केले, त्यांच्यापेक्षा आपली अर्थव्यवस्था सुधारली. पुढील दोन वर्षात पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था झाल्यास भारत विकसित जर्मनी आणि जपानच्या पुढे जाईल, असे डॉ. कराड यांनी नमूद केले.
हेही वाचा : शहरात तीन ठिकाणी अपघात रोखण्यासाठी उपाययोजना, वाहतूक पोलिसांचा पुढाकार
मोदी सरकारच्या काळात काढलेले कर्ज हे विकासासाठी आहे. त्यातून विकास साध्य होत आहे. काँग्रेसकडून वाढत्या कर्जाविषयी केले जाणारे आरोप तथ्यहीन आहेत. सरकारी कंपन्यांचे दोन गटात वर्गीकरण करण्यात आले आहे. काही कंपन्या अत्यंत चांगली कामगिरी करीत असून त्या गरजेच्या आहेत. काही कंपन्यांमध्ये वर्षानुवर्ष सरकारला पैसे टाकावे लागत होते. त्यात सुधारणा होत नव्हती. एअर इंडियासारख्या कंपन्या बंदही करता येत नव्हत्या. त्यामुळे अशा सरकारी कंपन्या विकाव्या लागतात, असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा : कांदा निर्यात बंदीप्रश्नी वरिष्ठ नेते केंद्रीय नेत्यांना भेटणार, दादा भुसे यांची ग्वाही
केंद्र सरकारच्या योजनांची माहिती देण्यासाठी फिरणाऱ्या रथाला ग्रामीण भागात विरोध होत असल्याचे निदर्शनास आणून दिले असता, रथाला विरोध करणारे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते असल्याचा आरोप डाॅ. कराड यांनी केला. काही ठिकाणी शेतकरी विरोध करीत असल्याचे लक्षात आणून दिल्यावर डॉ. कराड यांनी केद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी आणलेल्या योजनांची जंत्री कथन केली. जनतेची सेवा करण्यासाठी हा रथ आहे. त्याला विरोध करण्याचे कारण काय, असा प्रश्न करीत यात कुठलेही राजकारण करू नये. रथ गावात आल्यास त्याचे स्वागत करा. ज्यांना योजनांची माहिती घ्यायची आहे, त्यांना ती घेऊ द्या. सरकारी योजनांच्या चाललेल्या प्रचाराकडे सकारात्मकतेने पाहा, असा सल्ला त्यांनी दिला. सीमावर्ती भागात अतिरेक्यांच्या हल्ल्यात जवान शहीद होत असल्याच्या प्रश्नावर त्यांनी काँग्रेस सरकारच्या काळाशी तुलना केल्यास अतिरेकी हल्ल्यांच्या घटनांमध्ये घट झाल्याचे नमूद केले.