नाशिक : बुधवारी दुपारी शहरासह जिल्ह्यातील काही भागात गारांसह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. शिंदे पळसे, माडसांगवी परिसरात गारपीट झाली. शहरातील पंचवटीसह बागलाण, त्र्यंबकेश्वर, महिरावणी, भागात अर्धा ते पाऊण तास जोरदार पाऊस झाला. या नैसर्गिक संकटाचा काढणीवर आलेल्या द्राक्षबागा, गहू, कांदा हरभरा आदी पिकांना फटका बसला आहे.

महिनाभरापासून उन्हाचा तीव्र तडाखा जाणवत असताना दोन दिवसांत वातावरणात पूर्णत: बदल झाले. उन्हाळ्यात पावसाळी वातावरणाची अनुभूती मिळत आहे. मंगळवारी येवला आणि मनमाडमध्ये पावसाचा शिडकावा झाला होता. बुधवारी दुपारनंतर मात्र पावसाने जिल्ह्यातील अनेक भाग व्यापला. विजांच्या कडकडाटासह जोरदार हजेरी लावली. अकस्मात सुरू झालेल्या पावसाने नागरिकांसह शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. शिंदे पळसे, माडसांगवी भागात गारांसह पाऊस झाल्याची माहिती तहसीलदार शोभा पुजारी यांनी दिली. बागलाण तालुक्यात अर्धा तास पावसाने झोडपले. कांदा पीक आडवे झाले. करंजाळी खोऱ्यात काही प्रमाणात गारा पडल्या. त्र्यंबकेश्वर, महिरावणी भागातही सलग दुसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली. सिन्नर तालुक्यात धोंडबार येथे वीज कोसळून रामचंद्र खेताडे यांची म्हैस मृत्युमुखी पडली. नाशिकरोड परिसरात सखल भागात पाणी साचले.

सध्या गहू, कांदा, हरभरा ही पिके काढणीवर आली आहेत. अवकाळीने हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली. भाजीपाला आणि कांद्यावर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. द्राक्षांचा हंगाम संपुष्टात येण्याच्या मार्गावर असताना काढणीवर असलेल्या ज्या बागा शिल्लक आहेत, त्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने द्राक्ष उत्पादकांमध्ये निराशा आहे. नाशिक जिल्ह्यात दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. मंगळवारपेक्षा बुधवारी त्याचा जोर अधिक राहिल्याने कांदा, हरभरा, द्राक्ष यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

बागलाण तालुक्यातील अंतापूर, ताहाराबाद, जायखेडा, निरपूर आदी भागात बुधवारी सायंकाळी एक ते दीड तास मुसळधार पावसाने झोडपून काढले. या अवकाळीमुळे शेतपिकांचे नुकसान झाले आहे. विशेषत: काढणीला आलेला कांदा, द्राक्ष,डाळिंब या पिकांना मोठ्या प्रमाणावर फटका बसणार असल्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. बुधवार सकाळपासूनच मालेगाव,सटाणा,कळवण या पट्ट्यात ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर वादळी वारे वाहू लागले. सायंकाळी काही ठिकाणी वादळ व विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला.