नाशिक : स्पर्धा परीक्षेचे वाढीव शुल्क रद्द करावे, लाड-पागे समितीनुसार सफाई कामगारांची नेमणूक करण्यात यावी, यांसह इतर प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी गुरूवारी वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शालिमार येथील बी. डी. भालेकर मैदानापासून मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकऱ्यांकडून सर्व प्रकारची कंत्राटी भरती रद्द करण्यात यावी, सरकारी क्षेत्रातील खासगीकरण, कंत्राटीकरण बंद करण्यात यावे, पेपरफुटी संदर्भात कडक कायदा करावा, जिल्हा परिषदेची शाळा बंद करण्याचा आणि समूह शाळा सुरू करण्याचा निर्णय रद्द करावा, केजी टु पीजी मोफत शिक्षण मिळावे, शिक्षण हक्क कायद्यानुसार पहिली ते दहावीपर्यंत मोफत आणि सक्तीचे शिक्षण करावे, आदी मागण्या करण्यात आल्या. मोर्चा अण्णा भाऊ साठे पुतळ्यापासून शालिमारमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोहचल्यावर एक मालमोटार रस्त्यात आडवी उभी करुन त्यावरच मोर्चेकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी व्यासपीठ करण्यात आले.

हेही वाचा : भेसळीच्या संशयातून मसाला, मिरची पावडर साठा जप्त

आरक्षण मोडीत काढण्याचा प्रयत्न – सुजात आंबेडकर

पाणी आरक्षणावर बोलतांना राज्यात १२ ते २० कुटूंबांनी पाण्यावर ताबा ठेवला आहे. या जोरावर त्यांनी साखर कारखाना, शेती, उद्योग यावर वर्चस्व मिळवत पैसा खिशात घातला. याच जोरावर सत्ता, शिक्षण संस्था ताब्यात घेतल्या. यामुळे ८० टक्के समाज वंचित राहिला. यात कष्टकरी, गरीब शेतकरी यांचा समावेश आहे. तीन हजार पोलिसांची कंत्राटी भरती होणार आहे. कंत्राटी भरती ही संविधानानुसार नसेल. यातून आरक्षण मोडीत काढण्याचा प्रयत्न होत असल्याची शंका यावेळी सुजात आंबेडकर यांनी व्यक्त केली.

मालमोटारीमुळे वाहतूक कोंडी

मोर्चासाठी मोर्चातील सहभागी वाहनांसाठी पोलिसांकडून परवानगी घेण्यात आली होती. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आल्यावर विरूध्द दिशेला असलेल्या जिल्हा शासकीय कन्या विद्यालयाजवळ मोर्चातील मालमोटार रस्त्यात आडवी उभी करुन त्याच मालमोटारीवल व्यासपीठ तयार करण्यात आले. या वाहनामुळे तसेच मोर्चामुळे परिसरातील वाहतूक खोळंबली. मध्यवर्ती बस स्थानक परिसर ते अशोकस्तंभ या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली.

हेही वाचा : कैद्यांनी केलेल्या निर्मित वस्तूंचे प्रदर्शन, विक्री केंद्राचे उद्घाटन

मराठा आंदोलकांची भेट

नाशिकच्या शिवतीर्थावर सकल मराठा समाजाच्या वतीने आरक्षणासाठी साखळी उपोषण ५८ दिवसांपासून सुरू आहे. आंदोलनस्थळी जाऊन, बाळासाहेब आंबेडकर यांनी याआधीच मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पाठिंबा दिला असल्याचे सुजात आंबेडकर यांनी सांगितले. मी सुजय कायम मराठा आरक्षणासाठी आपल्यासोबत आहे, असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी सकल मराठा समाजाचे आंदोलक चंद्रकांत बनकर, प्रवक्ते राम खुर्दळ यांनी मराठा समाजाच्या शिक्षण व रोजगाराच्या मूलभूत आरक्षणासाठी आम्ही आंदोलन करत असून ४० वर्षे मराठा समाजाला सत्ताधाऱ्यांनी फसवल्याचा आरोप केला. हक्काच्या आरक्षणापासून आम्हाला वंचित ठेवले. आम्ही आता मूलभूत गरजाही भागवू शकत नसल्याने मुलांची लाखोंची फी कुठून भरणार, असा प्रश्न केला. आपली साथ, पाठिंबा हा आमची ऊर्जा वाढवतो, असे सांगितले. यावेळी आंदोलक शरद लभडे, हिरामण वाघ, ॲड. कैलास खांडबहाले, सुधाकर चांदवडे, विकी गायधने आदी उपस्थित होते.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nashik vanchit bahujan aghadi march for pending demands in the leadership of sujat ambedkar css
Show comments