नाशिक: ज्येष्ठ कवी, भाषातज्ज्ञ, समीक्षक तथा चंद्रपूर येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांची कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. नाशिकच्या सांस्कृतिक वैभवात कुसुमाग्रज प्रतिष्ठानने जनस्थान, गोदागौरव यासह अन्य कार्यक्रमांतून स्वतंत्र ठसा उमटवला आहे. आजवर प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल, न्या.चंद्रशेखर धर्माधिकारी, ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, न्या. नरेंद्र चपळगांवकर यांनी काम पाहिले आहे. न्या. चपळगांवकर यांचा कार्यकाळ संपल्याने अध्यक्षपदाची सूत्रे वसंत आबाजी डहाके यांच्या हाती सोपविण्याचा निर्णय प्रतिष्ठानच्या विश्वस्त मंडळाने घेतला. पुढील पाच वर्ष ते अध्यक्षपदाची धुरा सांभाळणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : गंगाघाट नेस्तनाबूत करण्यास नाशिक वाचवा कृती समितीचा विरोध

डहाके यांचे शुभवर्तमान, योगभ्रष्ट, चित्रलिपी या कवितासंग्रहासह ललित साहित्य, वैचारिक तसेच संशोधनपर साहित्य प्रसिद्ध असून त्यांच्या साहित्याचे अन्य भाषेतही भाषांतर झाले आहे. कविवर्य डहाके यांना साहित्य अकादमी तसेच कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या जनस्थानसह इतर अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. प्रतिष्ठानचे विश्वस्त म्हणून प्रसिद्ध समीक्षक प्रा. डॉ. दिलीप धोंडगे, ज्येष्ठ पत्रकार आणि लेखिका संध्या नरे-पवार, ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा यांची नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती प्रतिष्ठानचे कार्यवाह मकरंद हिंगणे यांनी दिली.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nashik vasant abaji dahake elected as president of kusumagraj pratishthan css
Show comments