नाशिक : राज्य उत्पादन शुल्कचा कळवण विभाग आणि दिंडोरी भरारी पथक यांनी संयुक्त पध्दतीने केलेल्या कारवाईत शनिवारी मुंबई-आग्रा महामार्गावरील दहावा मैल परिसरातून ३२ लाख रुपयांचा मद्यसाठा जप्त केला. कळवण येथील राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि दिंडोरीचे भरारी पथक यांना राज्यात प्रतिबंधित असलेल्या दारु साठ्याची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार ओझरजवळील दहावा मैल येथे सापळा रचला. एक मालवाहतूक वाहन तपासणीसाठी थांबवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने पथकाला गुंगारा देण्याचा प्रयत्न केला.
पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पाठलाग करुन वाहन अडवले. वाहनाची तपासणी केली असता वाहनाच्या मागील बाजूस चोरकप्पा बनवून त्यात गोवा राज्यात निर्मित तसेच गोवा राज्यातच विक्रीसाठी असलेला मद्याचा साठा मिळून आला. पोलिसांनी वाहनासह मद्यसाठा जप्त केला. वाहनासोबत असलेला चालक साहिल सय्यद तसेच सहायक मुकेश गाढवे यांना अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा : नाशिक : फरार संशयित ताब्यात
सदर गुन्ह्यात चालकाने दिलेल्या माहितीनुसार मद्यसाठा घेणारा व पुरवठादार तसेच जप्त वाहनाचा मालक यांचे विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मद्याची एकूण १४३ खोकी, मालवाहतूक वाहन असा ३२, १४, ७७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.