नाशिक: गंगापूर धरणातील पाणी उचलण्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी पोलीस बंदोबस्तात काश्यपीतून विसर्ग करणाऱ्या पाटबंधारे विभागाने स्थानिकांच्या विरोधानंतर एक पाऊल मागे घेतले आहे. पहिल्या दिवशी ५०० क्युसेकचा विसर्ग आता २२५ क्युसेकवर आणला गेला. ५०० क्युसेक वेगाने गंगापूरमध्ये पाणी येण्यास १२ दिवसांचा कालावधी लागणार होता. त्याचा वेग निम्म्याने कमी केल्याने हा कालावधी दुप्पट होईल. वहनव्यय वाढून पुरेसे पाणी ना गंगापूरमध्ये जाईल, ना धरण परिसरातील गावांना त्याचा उपयोग होईल, अशी विचित्र स्थिती निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
पाटबंधारे विभागाच्या भूमिकेमुळे महापालिकेला गंगापूरमधून पाणी उचलण्यातील अडचणी कायम राहण्याची शक्यता आहे. खालावलेल्या पातळीमुळे गंगापूरमधून पाणी उचलण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे महानगरपालिकेच्या मागणीनुसार स्थानिकांच्या विरोधाला न जुमानता सोमवारी पाटबंधारे विभागाने काश्यपी धरणातून गंगापूरसाठी पाण्याचा विसर्ग सुरू केला. यातून शहरावरील जलसंकट तूर्तास दूर होण्याची शक्यता निर्माण झाली. काश्यपीतून पाणी सोडण्यास स्थानिकांचा विरोध आहे. त्यामुळे विसर्ग करताना पोलीस बंदोबस्त तैनात करावा लागला. संतप्त ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची भेट घेऊन विसर्ग रोखण्याची मागणी केली होती. काश्यपी धरणालगत धोंडेगाव, काश्यपीनगर, इंदिरानगर व देवरगाव ही गावे आहेत. त्यांची लोकसंख्या २० ते २५ हजार असून या ठिकाणी पशूधनही मोठ्या प्रमाणात आहे. रहिवासी, जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी काश्यपीत ३० टक्के पाणी कायमस्वरूपी आरक्षित ठेवावे, अशी मागणी त्यांनी केली. या घडामोडीनंतर प्रशासनाने संघर्ष टाळण्यासाठी काश्यपीतील विसर्गाचे प्रमाण निम्म्याने कमी करण्याचा मध्यमार्ग स्वीकारला.
हेही वाचा : नाशिक: ३० कुटुंबांचे घराचे स्वप्न अधांतरी; बांधकाम व्यावसायिकाकडून सव्वा तीन कोटींना गंडा, संशयित फरार
बुधवारपासून काश्यपीतील विसर्ग २२५ क्युसेकवर आणला गेला. पाण्याचा वेग कमी झाल्यामुळे वहनव्यय वाढणार आहे. पावसाअभावी पात्र कोरडे आहे. वेगाने पाणी सोडल्यास वहनव्यय कमी होतो. वेग कमी झाल्यामुळे नुकसान वाढणार आहे. ही बाब ज्ञात असूनही स्थानिकांच्या दबावासमोर पाटबंधारे विभाग झुकल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
आज बैठक
काश्यपीतील पाण्याबाबत शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होणार आहे. त्यानंतर विसर्गाबाबत स्पष्टता होईल, असे पाटबंधारे विभागाकडून सांगितले जाते. काश्यपीतील विसर्ग थांबविला गेला नसून ५०० क्युसेकवरून तो २२५ क्युसेकवर आणला गेल्याचे या विभागाने म्हटले आहे.