नाशिक: सलग दुसऱ्या दिवशी पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरण तुडूंब भरण्याच्या मार्गावर असून रविवारी दुपारी त्याचे दरवाजे प्रथमच उघडण्यात आले. दारणा, भावली, भाम, पालखेड, कडवा या धरणातील विसर्ग वाढविला गेला आहे. गंगापूरच्या विसर्गामुळे गोदावरी दुथडी भरून वहात असून नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसाचा जोर इतका आहे की, २४ तासात तब्बल १७४२ दशलक्ष घनफूट म्हणजे सुमारे पावणेदोन टीएमसी पाणी नांदूरमध्यमेश्वरमधून जायकवाडीसाठी सोडले गेले.
शनिवारी रात्रीपासून अनेक भागात सुरू असणारी संततधार रविवारी कायम आहे. धरणांचे पाणलोट क्षेत्र व घाटमाथा भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पावसावर अवलंबून धरणांच्या जलसाठ्यात लक्षणीय वाढ होऊन ती भरण्याच्या स्थितीत आहेत. ऑगस्टच्या प्रारंभी प्रत्येक धरणात किती पाणी हवे, याची परिचालन सूची असते. त्यानुसार नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात ८५ टक्के जलसाठा अपेक्षित आहे. पावसामुळे ही पातळी गाठली गेल्यामुळे रविवारी दुपारी १२ वाजता गंगापूरमधून विसर्ग करण्यात आला. टप्प्याटप्प्याने तो वाढवून चार हजार क्युसेकपर्यंत गेला. शहरात पाऊस सुरू असल्याने गोदावरी हंगामात प्रथमच दुथडी भरून वाहत आहे. पाण्याचा प्रवाह वाढत असल्याने पात्रात उतरू नये आणि पात्रात व लगतच्या भागात वाहने वा अन्य साहित्य ठेऊ नये, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले. गोदावरीप्रमाणे पालखेडच्या विसर्गामुळे कादवा नदी प्रवाहात मोठी वाढ झाली.
हेही वाचा : मनमाड रेल्वे स्थानकातून कडक बंदोबस्तात अबू सालेमची नाशिककडे पाठवणी
या शिवाय दारणामधून २२९६६, भावली १२१८, भाम ४३७०, पालखेड धरणातून ५५७० क्युसेकचा विसर्ग अव्याहतपणे सुरू आहे. अन्य धरणांच्या साठ्यात वाढ होत आहे. काश्यपी (३५ टक्के), गौतमी गोदावरी (६८ टक्के), आळंदी (४३), पालखेड (६४), करंजवण (२५ टक्के), वाघाड (४८), पुणेगाव (३९), दारणा (८६), भावली (१००), मुकणे (४१), वालदेवी (८२), कडवा (८६), नांदूरमध्यमेश्वर बंधारा (१००), भोजापूर (४५), चणकापूर (५२), हरणबारी (७६), केळझर (६६), गिरणा (१७), पुनद (४७ टक्के) जलसाठा आहे. माणिकपूंज आणि ओझरखेड ही दोन धरणे अजूनही कोरडी आहेत. जिल्ह्यातील धरणांमध्ये सध्या २८ हजार ७४८ दशलक्ष घनफूट म्हणजे ४४ टक्के जलसाठा आहे.
हेही वाचा : नाशिकमध्ये संततधार, चार धरणांमधून विसर्गात वाढ; गंगापूर ७५ टक्क्यांवर
जायकवाडीसाठी आतापर्यंत साडेसहा टीएमसी पाणी
नाशिक जिल्ह्यातील गंगापूर, दारणा व पालखेड धरण समुहातील पाणी नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यात येते. येथून गोदापात्रातून ते पुढे मराठवाड्यातील जायकवाडी धरणाकडे मार्गस्थ होते. रविवारी नांदूरमध्यमेश्वरमधून हंगामातील आतापर्यंतचा सर्वाधिक सुमारे ४५ हजार क्युसेकचा विसर्ग करण्यात आला. मागील २४ तासांत धरणांतून १७४२ दशलक्ष घनफूट म्हणजे (पावणेदोन टीएमसी) पाणी जायकवाडीकडे मार्गस्थ झाल्याचे पाटबंधारे विभागाची आकडेवारी आहे. एक जून ते चार ऑगस्ट या कालावधीत नांदूरमध्यमेश्वरमधून सहा हजार ४६४ म्हणजे जवळपास साडेसहा टीएमसी पाण्याचा विसर्ग झाला आहे. रविवारच्या मुसळधार पावसाने पुढील २४ तासात विसर्गाचे प्रमाण आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.