नाशिक: हॅलो, दिल्लीहून बोलतेय, अमूक मॅडमशी बोलायचंय, त्यांना दूरध्वनी द्या… त्यांच्याशी दूरध्वनी जोडला (कॉन्फरन्स) की, त्यांच्या भावाशी बोलायचे आहे.. त्यालाही दूरध्वनी जोडला की, त्याच्या परिचितातील अन्य एखाद्या व्यक्तीशी बोलायचे असल्याचे कारण सांगितले जाते. शहरातील हं.प्रा.ठा. महाविद्यालयातील प्राचार्य आणि प्राध्यापक दोन दिवसांपासून सातत्याने येणाऱ्या अशा अज्ञात फोनमुळे त्रस्त झाले आहेत. महिला प्राध्यापिकेशी बोलायचे कारण देत एकेकास वेगवेगळ्या क्रमांकाहून दिवसभरात १०० ते १५० दूरध्वनी येत असल्याने समस्त प्राध्यापक वर्गाला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
दोन दिवसांपासून वारंवार येणाऱ्या दूरध्वनीच्या जाचामुळे हंप्राठातील प्राचार्य, प्राध्यापक वर्ग हैराण झाला आहे. महाविद्यालयात कार्यरत एका महिला प्राध्यापिकेला प्रारंभी असे काही दूरध्वनी आले होते. दुपारपासून सुरू झालेल्या दूरध्वनीचा भडिमार रात्री उशिरापर्यंत कायम राहिला. या काळात त्यांनी जेव्हा जेव्हा दूरध्वनी घेतला, समोरून मुलीने त्यांच्या भावाचे नाव सांगून त्यांच्याशी बोलायचे असल्याचे कारण दिले. महिला प्राध्यापिकेने भावाला दूरध्वनी जोडल्यावर समोरून त्यांच्या परिचितातील अन्य व्यक्तीचे नाव सांगून त्याच्याशी बोलायचे असल्याचे सांगितले गेले. या प्रकारामुळे प्राध्यापिका चक्रावल्या. नंतर संबंधित प्राध्यापिकेशी बोलायचे आहे, असा महाविद्यालयातील प्राचार्य व इतर प्राध्यापकांना दिल्लीहून भ्रमणध्वनीचा मारा सुरू झाला. काही प्राध्यापकांनी संबंधित महिला प्राध्यापिकेशी दूरध्वनी जोडून दिला असता, आधीसारखा अनुभव आला. एकाचे नाव सांगून नंतर दुसऱ्याशी, मग तिसऱ्याशी बोलायचे कारण समोरून दिले गेले. संबंधितांना या गडबडीत अडकवून ठेवले जात असल्याचा अंदाज आहे. या प्रकारास वैतागलेल्या काही प्राध्यापकांनी अनोळखी भ्रमणध्वनी घेणे बंद केल्यावर वेगवेगळ्या क्रमांकावरून त्यांच्याशी संपर्क साधला जाऊ लागला. मुलीच्या आवाजात दिल्लीहून संपर्क साधणाऱ्यांना प्राध्यापकांची नावे माहिती आहेत. त्यांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला तरी दिवसभरात १०० ते १५० भ्रमणध्वनींना तोंड द्यावे लागत आहे.
संपर्क साधणारे नेमके काय काम आहे, हे सांगत नाहीत. निव्वळ फिरवाफिरवी करून बोलण्यात गुरफटून ठेवतात. नेमके काय चाललेले आहे, हे देखील आकलनापलीकडे गेले असून अज्ञात दूरध्वनीमुळे मानसिक छळ होत असल्याची तक्रार महिला प्राध्यापिकेने केली. महाविद्यालयातील अन्य प्राध्यापकांची वेगळी स्थिती नाही. समोरून हिंदी भाषेतून सर्वांशी एकसारखा संवाद साधला जातो. या संदर्भात पोलिसात तक्रार देण्याचा विचार प्राध्यापक करीत आहेत.
हेही वाचा : नाशिक: शासकीय योजनांची केंद्रीय समितीकडून पाहणी
फेसबुकवर एखाद्याची बनावट माहिती टाकून संदेश पाठविण्याचे प्रकार घडत असून तशा तक्रारी येत आहेत. परंतु, एकसारखे अज्ञात भ्रमणध्वनी आल्याचे प्रकार घडल्याच्या तक्रारी आलेल्या नाहीत. संबंधित प्राध्यापकांनी या संदर्भात पोलिसांकडे तक्रार करावी. त्यांना एकसारखे भ्रमणध्वनी करण्यामागे कुणाचातरी खोडसाळपणा असण्याची शक्यता आहे. त्रास देण्याच्या उद्देशाने हे कृत्य केले जात असावे.
रियाज शेख (वरिष्ठ निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे, नाशिक)