नाशिक: कौटुंबिक वादाची तक्रार देणाऱ्या विवाहितेसह तिच्या आईस मारहाण करुन दोघींविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी येथे खोटा गुन्हा दाखल करून अटक केल्याप्रकरणी महिला पोलीस निरीक्षकासह सात महिला अंमलदारांना पोलीस तक्रार प्राधिकरणने दोषी ठरविले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलीस प्रशासनाने संबंधितांवर कारवाई करावी, असे आदेश प्राधिकरणने दिले आहेत, अशी माहिती ॲड. उमेश वालझाडे यांनी दिली. वालझाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. प्राजक्ता नागरगोजे यांनी महिला सुरक्षा समितीकडे कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार केली होती. ३० मार्च २०२२ रोजी समुपदेशन करताना समितीच्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी नांदण्यास सासरी जावे, असे प्राजक्ता यांना सांगितले. त्यांनी नकार दिल्याने समितीच्या तत्कालीन पोलीस निरीक्षक ज्योती आमने यांनी प्राजक्ता यांना मारहाण केली. तसेच इतर आठ महिला कर्मचाऱ्यांनीही बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केल्याचा आरोप प्राजक्ता यांनी केला. आईसह सरकारवाडा पोलीस ठाण्यात बसवून सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात दोघा मायलेकींना अटक करून सहा दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवले. जामीन मिळाल्यानंतर प्राजक्ता यांनी पोलीस तक्रार प्राधिकरणाकडे आमने यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांविरोधात तक्रार दिली.

हेही वाचा : पावसामुळे मनमाड-मुंबई दरम्यानची रेल्वे वाहतूक विस्कळीत; अनेक रेल्वे गाड्यांचे मार्ग बदलले, काही गाड्या माघारी

त्याअनुषंगाने विभागाचे प्रशासकीय अधिकारी डॉ. रुपाली लाटे यांच्यासमोर सुनावणी झाली. त्यात प्राजक्ता यांच्या वतीने ॲड. उमेश वालझाडे, ॲड. प्रशांत देवरे, ॲड. राज सिंग यांनी युक्तीवाद केला. त्यात सातही महिला पोलिसांवर पदाचा गैरवापर करण्याचा ठपका ठेवण्यात आला. संबंधित सातही पोलिसांना दाेषी धरून त्यांच्यावर कारवाई करावी, असे आदेश विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणचे सदस्य अमित डमाळे, शामराव दिघावकर यांनी दिले आहेत.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nashik woman with her mother brutally beaten up by woman constables in sarkarwada police station css
Show comments