नाशिक – पत्नी नांदावयास येत नसल्याच्या रागातून पत्नीसह सासुला जिवंत जाळण्याच्या प्रयत्नात कामगाराचा मृत्यू झाला. सिन्नर तालुक्यातील सोनारी येथे हा प्रकार घडला. याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात सायंकाळी उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. या घटनेत भाजलेल्या दोन्ही महिलांची प्रकृती गंभीर आहे.
सोनारी गावातील सोमनाथ शिंदे हे पत्नी अनिता आणि मुलगी स्नेहल यांच्याबरोबर राहतात. स्नेहलचे लग्न सिन्नर औद्योगिक वसाहतीत राहणाऱ्या केदार हंडोरे याच्याशी सात महिन्यांपूर्वी झाले. काही दिवसांपासून स्नेहल आणि केदार यांच्यात वाद सुरु होते. यामुळे स्नेहल माहेरी राहण्यासाठी निघून आली होती. रविवारी सर्व आवराआवर झाल्यानंतर स्नेहल आईसह झोपली होती..
सोमनाथ शिंदे हे गच्चीत झोपले होते. मध्यरात्री केदार हा काही मित्रांबरोबर स्नेहलला घरी घेऊन जाण्यासाठी सोनारी येथे आला. यावेळी दोघांमध्ये पुन्हा वाद झाले. रागाच्या भरात केदारने स्वत:ला पेटवून घेत स्नेहल आणि सासु अनिता यांना मिठी मारली. दोघींना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. मदतीसाठी अनिता यांनी शेजारी राहणाऱ्या नातेवाईकांच्या घराचा दरवाजा ठोठावल्यावर सर्व प्रकार लक्षात आला. परिसरातील लोकांनी आग विझवत दोघांना वाचविण्याचा प्रयत्न केला.
या घटनेत स्नेहल आणि अनिता या गंभीर भाजल्या असून त्यांना नाशिक येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. केदारचा रुग्णालयात मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी उशीरापर्यंत या प्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.