नाशिक : उंटवाडी रस्त्यावरील क्रांतीनगर भागात टोळक्याने एका युवकाचा लोखंडी पहार, लाडकी दांडके आणि दगडाने ठेचत अतिशय निर्घूणपणे खून केल्याच्या घटनेमुळे स्थानिकांमध्ये घबराट पसरली आहे. या हल्ल्याची चित्रफीत समाजमाध्यमांवरून प्रसारीत झाली.
या घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत चार संशयितांना २४ तासाच्या आत जेरबंद केले.क्रांतीनगर येथे टोळक्याच्या हल्ल्यात नितीन शेट्टी (३३, आदिवासी विकास सोसायटी) या युवकाचा मृत्यू झाला. याबाबत बहीण सोनाली चौधरी यांनी तक्रार दिली. त्यावरून गणेश यादव लाखन, रोशन निसाळ, नागेश निसाळ, यादव लाखन, राजेंद्र लाखन आणि दुचाकीवरील दोन अनोळखी अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. संशयित संध्याकाळी लोखंडी पट्टी, पहार धारदार शस्त्र घेऊन आले. त्यांनी नितीनच्या मोटारसायकलची तोडफोड केली. हा आवाज ऐकून नितीन घराबाहेर आल्यानंतर संशयितांनी त्याला मारहाण करीत खाली पाडले. काहींनी पहार, काहींनी लाकडी दांडक्याने हल्ला केला. तोंडावर दगड मारून त्याचा खून करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा : नंदुरबार जिल्ह्यात बस उलटली
या घटनेची पोलिसांनी गांभिर्याने दखल घेतली. मुंबईनाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे यांनी सहायक निरीक्षक सुधीर पाटील व सतीश शिरसाठ यांच्यासह घटनास्थळी भेट दिली. पाटील व शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली पथके तयार करून संशयितांचा शोध सुरू केला. संशयित हे पंचवटीतील वाघाडी परिसरात लपून बसल्याची गुप्त माहिती मिळाली. त्याआधारे गुन्हे शोध पथकाने वाघाडी नाल्याजवळील मेरीच्या मोकळ्या जागेवरील झाडी झुडपात घेराव घातला. पथकाची चाहूल लागताच संशयित पळू लागले. पथकाने पाठलाग करून रोशन निसाळ (२३), गणेश लाखन (३१, दोघेही क्रांतीनगर), नितीन गांगुर्डे (२३), गोविंद निसाळ (२३, दोघेही वाघाडी, पंचवटी) यांना शिताफीने पकडले. मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली.