नाशिक : गोदावरी संवर्धनावर दरवर्षी प्रचंड निधी खर्च होऊनही नदीपात्र कायमस्वरुपी जलपर्णीमुक्त राखणे अद्याप शक्य झाले नसताना आता या जलपर्णी जिवावर बेतू लागल्या आहेत. येथे अंघोळीसाठी गोदापात्रात उतरलेल्या १८ वर्षाच्या युवकाचा जलपर्णीत अडकून मृत्यू झाला. तीन मित्रांबरोबर इयत्ता बारावीतील अमोल वाघ (१८, शिवनगर, आनंदवल्ली) गोदावरी नदीत अंघोळीसाठी गेला होता. चांदशी पुलालगत सर्वजण पाण्यात उतरले. पोहत तिघे बंधाऱ्याच्या भिंतीलगत पोहोचले, पण अमोल बुडाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक माजी नगरसेवक संतोष गायकवाड यांनी मनपा अधिकाऱ्यांशी संपर्क साधून जलपर्णी काढणारे यंत्र उपलब्ध करण्याची मागणी केली. तथापि, पुला पलीकडे नेण्यासाठी येणारा खर्च आणि क्रेनद्वारे यंत्र उचलताना काही नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी कुणाची, यामुळे यंत्र उपलब्ध झाले नाही. मनपाने जेसीबीच्या सहाय्याने जलपर्णी दूर केली. तथापि, अमोलचे प्राण वाचू शकले नाहीत. अमोल जलतरण तलावात कामाला होता.
हेही वाचा : मनसेच्या भविष्यातील राजकीय भूमिकेचे ‘राज’ कायम
दोन वर्षांपूर्वी चांदशी पूल ते बंधारा या भागातील पाणवेली काढल्या गेल्या होत्या. त्यानंतर आजतागायत त्याकडे दुर्लक्ष झाले. नियमितपणे पाणवेली काढल्या असत्या तर युवकाला प्राण गमवावे लागले नसते. असे माजी नगरसेवक गायकवाड यांनी म्हटले आहे. जलपर्णी काढणारे यंत्र (ट्रॅश स्किमर) पुलापलीकडे नेण्यासाठी क्रेनला ८० हजार रुपये खर्च येतो. यामुळे मनपा प्रशासनाने गोदावरीतील या भागाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. परंतु, हे आक्षेप फेटाळत महापालिकेने संबंधिताचा मृत्यू जलपर्णीत अडकून झाला नसल्याचा दावा केला आहे. अनेक ठिकाणी सांडपाणी मिसळत असल्याने गोदावरीत जलपर्णी मोठय़ा प्रमाणावर फोफावतात. धरणातून विसर्ग झाल्यानंतर जलपर्णी वाहत जाऊन पात्रात इतरत्र अडकतात. गोदावरी संवर्धनावर महानगरपालिका दरवर्षी कोट्यवधींचा निधी खर्च करते. तथापि, प्रदुषणातून मुक्ततेअभावी गोदावरी नदी जलपर्णींच्या विळख्यात सापडल्याची स्थिती आहे.
हेही वाचा : जळगावात अग्नितांडव; फर्निचर दुकानासह वॉशिंग सेंटर खाक
“जलपर्णी काढणारे यंत्र (ट्रॅश स्किमर) पुलाच्या पलीकडे नेण्यासाठी सहा तास लागले असते. त्यासाठी दोन क्रेन लागणार होत्या. शिवाय ते यंत्र हलविण्यासाठी कंत्राटदाराचे तांत्रिक पथकही लगेचच उपलब्ध होणे शक्य नव्हते. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आपण स्वत: घटनास्थळी भेट दिली. जेसीबीद्वारे जलपर्णी हटविण्याची व्यवस्था केली. संबंधित युवकाचा मृत्यू जलपर्णीत अडकून झालेला नाही. स्थानिकांकडून नदीपात्रात एका बाजुला कचरा फेकला जातो. त्या गाळात अडकून युवकाचा मृत्यू झाला आहे. पुलामुळे तिथे यंत्राचा वापर केला जात नाही. जलपर्णी काढणारे यंत्र क्रेनद्वारे एकदा बाहेर काढणे व पुन्हा दुसऱ्या ठिकाणी नदीपात्रात सोडणे यासाठी मनपाला प्रत्येकी ४० हजार रुपयांचे शुल्क द्यावे लागते. तांत्रिक पथक नसताना यंत्र परस्पर हलवणे योग्य नव्हते”, असे विजयकुमार मुंडे (उपायुक्त तथा प्रमुख, गोदावरी संवर्धन कक्ष) यांनी म्हटले आहे.