नाशिक : पंचवटीतील अमृतधाम परिसरातील बिडी कामगार नगरात टोळक्याने रविवारी रात्री युवकाची हत्या केल्यानंतर सोमवारी दिवसभर परिसरात तणाव पसरला होता. लहान मुलांच्या किरकोळ भांडणावरून ही हत्या झाल्याची माहिती आडगाव पोलिसांनी दिली. विशांत उर्फ काळू भोये (२४) हा रविवारी रात्री बिडी कामगार नगरातील स्वामी समर्थ केंद्राजवळ मित्रांबरोबर गप्पा मारत होता. यावेळी महिलांसह आठ ते १० तरुण त्याठिकाणी आले. त्यांनी विशांत आणि त्याच्या मित्रांच्या डोळ्यात मिरची पूड फेकून हल्ला केला. एकाने विशांतवर कोयत्याने वार केला. यानंतर संशयित पळून गेले. विशांत यास खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
हेही वाचा : नाशिक : फवारणीवेळी औषध नाकात गेल्याने शेतकरी महिलेचा मृत्यू
परंतु, डॉक्टरांनी मृत घोषित केले. दोन दिवसांपूर्वी विशांतने लहान मुलांच्या झालेल्या भांडणावरून एका मुलाला मारले होते. याचा राग डोक्यात ठेवत संशयितांनी हा हल्ला केला. महिलांनी मिरची पूड फेकल्यानंतर इतरांनी मारहाण केली. मच्छिंद्र जाधवने विशांतवर प्राणघातक हल्ला केला. आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन खैरनार यांनी काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या घटनेनंतर सोमवारी पहाटे संतप्त टोळक्याने बिडी कामगार नगरातील दोन रिक्षांसह काही वाहनांची तोडफोड केली. पोलिसांनी परिसरात बंदोबस्त वाढवला आहे.