जळगाव: रावेर तालुक्यातील ऐनपूर येथे पुनर्वसन संघर्ष समितीतर्फे विविध मागण्यांसाठी स्मशानभूमीत अनोखे पद्धतीने भूमिगत आंदोलन करण्यात आले. पुनर्वसन विभाग व तहसीलदारांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.हतनूर धरणाच्या फुगवट्याची पाणी ऐनपूर गावातील तिन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात साठलेले असते. या भागातील घरे अवघ्या १५ ते २० फूट अंतरावर आहेत. यामुळे घरांना जमिनीतून ओलावा असतो. त्यामुळे घराच्या भिंती उन्हाळ्यातही ओल्या असतात. ही घरे पडून जीवितहानी होण्याची शक्यता आहे. या भागात या पाण्यामुळे दलदल झालेली आहे.
डास, जनावरे, सर्प, घोणस, नाग, अजगर व मगरासारखे हिंस्त्र जलचर प्राण्यांपासून जीवितास धोका निर्माण झाला आहे.या भागाची पाहणी पुनर्वसन विभाग व इतर संबंधित अधिकार्यांकडून करण्यात आली. या भागातील २५० घरे ही रेड झोनमध्ये आहेत. ती तत्काळ उठवली जावीत, यासाठी संबंधित अधिकार्यांना पत्रव्यवहार केला. या भागातील लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकार्यांसह पुनर्वसन अधिकार्यांना वेळोवेळी मागण्यांसंदर्भात निवेदने दिली. मात्र, त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.
हेही वाचा >>>नाशिक: मंत्रिपद मिळाल्याने निधीची चिंता मिटली ,येवल्यातील ३६ कोटींची कामे पुरवणी अर्थसंकल्पात सामील
आता शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पुनर्वसन संघर्ष समितीचे अध्यक्ष सुधाकर महाजन, उपाध्यक्ष शेख हारुन, सचिव अनिल वाघोदे, संदीप महाजन, जगन्नाथ महाजन, प्रमोद पाटील, युसूफ शेख, चंद्रगुप्त भालेराव, शरद अवसरमल, गोपाल बारी, रामदास पाटील, हुसेन शेख, सरपंच अमोल महाजन, अनिल जैतकर, सुनील खैरे यांनी गावातील स्मशानभूमीत स्वतःला जमिनीत अर्धशरीर गाडून आंदोलन केले. यावेळी मध्य प्रकल्प विभाग- एकचे सहायक कार्यकारी अभियंता दीपराज बागूल,कनिष्ठ अभियंता प्रेमसागर कळमकर, स्थापत्य सहायक युवराज ढाके, तहसीलदार बी. ए कापसे यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले. यावेळी ग्रामविकास अधिकारी सुनील गोसावी, ऐनपूरचे मंडळ अधिकारी शेलकर, विजय शिरसाठ यांच्यासह गावातील महिला व पुरुष उपस्थित होते.