मालेगाव: शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी २०२४ नंतर नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे हे तुरुंगात जातील, असा इशारा दिल्यानंतर प्रत्युत्तरात भुसे यांनी राऊत यांचा दलाल माणूस असा उल्लेख केला. राष्ट्रवादीशी संधान साधून राऊत यांनी शिवसेना संपवण्याची सुपारी घेतली आहे, असा आरोपही भुसे यांनी केला.
गिरणा कारखान्याशी संबंधित १७८ कोटी शेअर्स घोटाळ्याचा आरोप केल्यामुळे भुसे यांनी राऊत यांच्याविरुद्ध येथील न्यायालयात बदनामीचा खटला दाखल केला आहे. या खटल्याच्या सुनावणीसाठी राऊत हे शनिवारी मालेगावी आले होते. यानिमित्ताने राऊत यांनी भुसे यांच्यावर टिकास्त्र सोडले. त्यांच्या टिकेला उत्तर देताना भुसे यांनी, लिलावात निघालेला गिरणा सहकारी कारखाना खरेदी करण्यासाठी गोळा करण्यात आलेल्या शेअर्सच्या रकमेत खरेच घोटाळा झाला का, यामागील सत्य काय आहे हे अवघ्या तालुक्याला माहीत असल्याचे सांगितले. न्यायालयासमोर वस्तुस्थिती येईल, तेव्हा राऊत यांना माफी मागावीच लागेल, असा विश्वास भुसे यांनी व्यक्त केला.
हेही वाचा… शिवसेना, राष्ट्रवादीला संपवणे हे संघाचे षडयंत्र; संजय राऊत यांचा आरोप
जिल्हा बँकेत कर्ज घोटाळा केल्यामुळे अद्वय हिरे हे तुरुंगात आहेत. दीड कोटीची मालमत्ता तारण ठेवून तब्बल सात कोटी ४६ लाखाचे कर्ज हिरे कुटुंबियांशी संबंधित संस्थेने घेतले. सुमारे १० वर्षांपूर्वी घेतलेल्या या कर्जाची परतफेड केली गेली नाही. त्यामुळे ३२ कोटींवर थकबाकीची रक्कम गेली. कर्ज वितरणाच्या वेळी अद्वय हिरे हे जिल्हा बँकेचे अध्यक्ष होते. त्यांच्या आई स्मिता हिरे या कर्ज घेणाऱ्या संस्थेच्या अध्यक्षा होत्या. फसवणूक करून घेतलेले कर्ज न फेडल्यामुळे बँकेने गुन्हा दाखल केला. यात सूडाचे राजकारण करण्याचा प्रश्न कुठे येतो, असा प्रश्न भुसे यांनी उपस्थित केला.
वाढत्या थकबाकीमुळे नाशिक जिल्हा बँक अडचणीत आली असून परवाना रद्द होण्याची टांगती तलवार बँकेवर आहे. शेतकऱ्यांची बँक असताना गरजू शेतकऱ्यांना बँकेकडून कर्ज मिळत नाही. बँकेचे ठेवीदार अडचणीत सापडले आहेत. अशावेळी शेतकरी व ठेवीदारांविषयी कळवळा दाखविण्याऐवजी बँकेची फसवणूक करणाऱ्यांचे राऊत हे समर्थन करत आहेत. असे समर्थन करताना लाज वाटली पाहिजे. राऊत यांनीच आता बँकेची ही थकबाकी भरुन द्यावी,असा टोलाही भुसे यांनी हाणला.