नाशिक – खालावलेल्या पातळीमुळे गंगापूरमधून पाणी उचलण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन स्थानिकांच्या विरोधाला न जुमानता सोमवारी पाटबंधारे विभागाने पोलीस बंदोबस्तात काश्यपी धरणातून गंगापूरसाठी पाण्याचा विसर्ग केला. काश्यपीतील सुमारे ४०० दशलक्ष घनफूट पाणी आल्यामुळे गंगापूरची पातळी उंचावणार आहे. शहरावरील टंचाईचे संकट निवारण्यासाठी ऐन पावसाळ्यात काश्यपीसह अनेक धरणे रिक्त करण्याची वेळ आली आहे. पोलिसांमार्फत दबाव टाकून पाटबंधारे विभागाने आमचे हक्काचे पाणी हिरावून नेल्याचा आरोप सरपंच व ग्रामस्थांनी केला आहे.
जूनचा उत्तरार्ध संपुष्टात येण्याच्या मार्गावर असतानाही अद्याप गंगापूर धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस झालेला नाही. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूरची पातळी खालावली आहे. सध्या त्यात ९१८ दशलक्ष घनफूट म्हणजे १६ टक्के जलसाठा आहे. या धरण समुहातील काश्यपीत ४१९ दशलक्ष घनफूट (२२ टक्के ) जलसाठा आहे. गंगापूर धरणातील पाणी पातळी ६१२.३ मीटरपर्यंत असणे आवश्यक ठरते. याखाली गेल्यास महानगरपालिकेला पाणी उचलण्यात अडचणी येतात. चर खोदावे लागतात. पावसाअभावी गंगापूरची पातळी ६०० मीटरपर्यंत खाली आल्यामुळे महापालिकेने काश्यपीतील पाणी गंगापूरमध्ये आणण्याची मागणी केली होती. हे पाणी गंगापूरमध्ये आल्यास धरणातील पाणी उचलणे सुकर होईल. अन्यथा शहरावर कपात वा तत्सम उपायांमुळे जल संकट निर्माण होण्याची चिन्हे होती. त्यामुळे पाणी सोडण्याची तयारी करण्यात आली होती. मात्र स्थानिकांच्या विरोधामुळे ते सोडता आले नव्हते. या पार्श्वभूमीवर, पाटबंधारे विभागाने पोलीस बंदोबस्त मागवून सोमवारी दुपारी पावणेबारा वाजता काश्यपीतील पाण्याचा मार्ग मोकळा केला. काश्यपीनगर व आसपासच्या शेतकऱ्यांनी विरोधाची तयारी केली होती. परंतु, पोलिसांनी त्यांना समज देऊन आठकाठी न करण्याची तंबी दिली. या विसर्गातून काश्यपीतील सर्व पाणी गंगापूरमध्ये आणले जाईल. जेणेकरून गंगापूरच्या पातळीत वाढ होईल आणि महापालिकेला पाणी उचलणे सुकर होणार आहे.
हेही वाचा >>>नाशिक शिक्षक मतदारसंघात आरोप-प्रत्यारोप
धरणासाठी जागा देणारेच तहानलेले
काश्यपी धरणासाठी जागा देऊन ६०० जण भूमिहीन झाले. आम्हाला पिण्यासाठी पाणी नाही. काही वर्षांपूर्वी पाटबंधारे विभागाने स्थानिकांसाठी धरणातील ३० टक्के पाणी राखीव ठेवण्याचे आश्वासन दिले होते. सध्या धरणात त्यापेक्षा कमी जलसाठा असूनही ते हिसकावून नेले जात आहे. पोलीस यंत्रणेद्वारे दबाव टाकून स्थानिकांना आंदोलनही करू दिले गेले नाही. परिसरातील धोंडेगाव, काश्यपीनगर, इंदिरानगर व देवरगाव ही चार गावे धरणातील पाण्यावर अवलंबून आहेत. गावातील महिलांना एक किलोमीटर पायपीट करून धरणातून पाणी आणावे लागते. एक-दोन दिवसांत परिसरातील सर्व ग्रुप ग्रामपंचायती ठराव करतील आणि पाटबंधारे विभागाला जाब विचारला जाईल. काश्यपी धरणाची निर्मिती करताना महापालिकेने भूमिहीनांना नोकरी देण्याचे दिलेले आश्वासनही पाळले नाही. केवळ ६० जणांना नोकरी मिळाली. उर्वरित बेरोजगार युवक शेतीवाडीवर उदरनिर्वाह करतात. – सुरेश मुंढे (सरपंच, काश्यपी-धोंडेगाव ग्रुप ग्रामपंचायत)