लोकसत्ता वार्ताहर
जळगाव: भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या करणार्या संशयिताला कठोर शिक्षा करावी, या मागणीसाठी शुक्रवारी सकल मराठा समाजासह अन्य समविचारी संघटनांच्या वतीने भडगावात मूक मोर्चा काढण्यात आला. गुरुवारी सायंकाळी पोलिसांनी संशयितास अटक केल्यावर त्यास आपल्या ताब्यात द्यावे, अशी मागणी करीत संतप्त जमावाने पोलीस वाहनावर केलेल्या दगडफेकीत चार पोलीस जखमी झाले होते. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमारही करावा लागला.
आणखी वाचा-नाशिक मनपाची सिटीलिंक बस सेवा पुन्हा ठप्प
गोंडगाव येथील अल्पवयीन मुलगी ३० जुलैला बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. तिचा मृतदेह एक ऑगस्टला घरानजीकच्या गोठ्यातील कडबा कुट्टीत मिळून आला. पीडित मुलीच्या घराजवळ राहणाऱ्या स्वप्नील ऊर्फ सोन्या पाटील (१९) याने हे कृत्य केल्याचे उघड झाल्यानंतर त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला घटनाक्रम समजून घेण्यासाठी गुरुवारी सायंकाळी गोंडगाव येथे नेण्यात आले असता संतप्त ग्रामस्थांनी चाळीसगाव शहर वाहतूक शाखेच्या मोटारीवर दगडफेक केली. त्यात भडगाव पोलीस ठाण्याचे हवालदार नितीन रावते, विलास पाटील (भडगाव), चाळीसगाव शहर वाहतूक शाखेचे दीपक पाटील, प्रकाश पाटील हे जखमी झाले. त्यानंतर जमावाला पांगविण्यासाठी लाठीमार करावा लागला होता. बंदोबस्तात वाढ करण्यात आली. दरम्यान, संशयिताला कठोर शिक्षेच्या मागणीसाठी शुक्रवारी भडगावात मोर्चा काढण्यात आला.