जळगाव : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनातर्फे ठिकठिकाणी तपासणीसह नाकाबंदी करण्यात येत आहे. मुक्ताईनगर येथे नाकाबंदीत २० लाखांच्या सोन्याच्या वस्तू मिळून आल्यानंतर आता चाळीसगाव येथे देशी-विदेशी मद्याचा साठा मिळून आला. कारवाईत वाहनासह पाच लाख १८ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी वाहनचालकाला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पोलीस प्रशासन सक्रिय झाले असून, जिल्ह्यासह राज्य सीमांवर नाकाबंदी करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्‍वर रेड्डी यांच्या आदेशान्वये चाळीसगावच्या अपर पोलीस अधीक्षिका कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अभयसिंह देशमुख यांच्या सूचनेनुसार चाळीसगाव- नांदगाव रस्त्यावर खडकी गावाजवळील बाबा पेट्रोलपंपाजवळ चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वात योगेश बेलदार, नितेश पाटील, पंढरीनाथ पवार, नीलेश पाटील, कल्पेश पगारे, महेंद्र सूर्यवंशी यांच्या पथकाने नाकाबंदी केली आहे. पथकाकडून वाहनांच्या तपासणीत खडकी गावाच्या दिशने जाणार्‍या वाहनांची तपासणी करीत असताना चाळीसगाव शहरातून खडकी गावाच्या दिशेने प्रवासी मोटार येताना दिसली. या वाहनावर पोलीस निरीक्षक पाटील यांचा संशय बळावल्याने चालकास वाहन थांबविण्यास सांगितले. वाहनाची तपासणी करताना देशी-विदेशी मद्य व बिअरच्या बाटल्या खोक्यात मिळून आल्या.

हेही वाचा – वंचितच्या भूमिकेने औरंगाबादमध्ये ठाकरे गटात चलबिचल

हेही वाचा – विश्लेषण : वनखात्यातील अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण काय आहे? वनखात्याची भूमिका वादग्रस्त कशी?

हेही वाचा – विश्लेषण : मराठा मतपेढी मराठवाड्यात किती प्रभावी? जरांगेंमुळे मतदानाची समीकरणे बदलतील?

वाहनचालकाकडे मद्याच्या वाहतुकीचा परवाना नसल्याने दोन पंचांना लगेच बोलावून वाहनाची तपासणी पंचनामा केला. त्यात देशी-विदेशी मद्यासह वाहन मिळून पाच लाख १८ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी वाहनचालक प्रीतम देशमुख (२६, रा. तळेगाव, ता. चाळीसगाव) यास वाहनासह ताब्यात घेऊन चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात आणले. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In the blockade of jalgaon district liquor stock worth five lakhs was seized ssb