नाशिक – सर्वांना शिक्षण हक्क कायद्यातंर्गत सोमवारपासून प्रवेश प्रक्रियेस आरंभ झाला असून पहिल्या यादीत चार हजार ८०० विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. या यादीतील विद्यार्थी ३१ जुलैपर्यंत शाळांमध्ये प्रवेश घेऊ शकणार आहेत.
राज्य शासनाच्या वतीने आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येता यावे, यासाठी सर्वांना शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ४२८ शाळा या अंतर्गत निवडण्यात आल्या आहेत. यामध्ये पाच हजार २७१ जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. यंदा जिल्ह्यातून प्रवेशासाठी १४ हजार ७८६ अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी पहिल्या यादीत चार हजार ८०० विद्यार्थ्यांची निवड झाली असून सोमवारपासून प्रवेश प्रक्रिया सुरु झाली. ३१ जुलैपर्यंत पहिल्या यादीतील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यानंतर प्रतिक्षा यादी जाहीर होईल.