नाशिक : दिवाळीप्रमाणेच मकरसंक्रांतीत पतंगोत्सवाचा आनंद नाशिक जिल्ह्यातील येवला येथील नागरिक घेत असतात. संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी येवल्यात पतंगोत्सवाला उधाण आले. सायंकाळपर्यंत नागरिकांनी पतंगी उडविल्यानंतर सायंकाळनंतर आतषबाजीमुळे येवल्याचे नभ न्हाऊन निघाले. येवल्याची पैठणी आणि पतंगोत्सव महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. यंदाच्या संक्रांतीनिमित्त पतंगोत्सवात त्याची पुन्हा प्रचिती आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

येवल्यात तीन दिवस पतंगोत्सवाचा उत्साह असतो. संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी, हा उत्साह अधिकच ओसंडून वाहतो. इमारतींच्या गच्चीवर, मैदानांमध्ये गटागटाने जमलेले अनेक जण पतंग उडविण्याचा आनंद घेत असतात. ते पुन्हा यंदा दिसून आले. अवघे वातावरण पतंगमय झाले. सर्वाच्या नजरा आकाशाकडे लागल्या होत्या. बालगोपाळच नव्हे तर, आबालवृद्ध व थोरा-मोठय़ांसह महिला, मुलींनीही पतंगोत्सवाचा आनंद घेतला. सकाळी गच्चीवर गेलेली मंडळी सायंकाळी अंधार होईपर्यंत पतंग उडविण्यात दंग होती. इमारतींच्या गच्चीवर गटागटाने जमून संगीताच्या तालावर पतंग उडविण्यात सारेच मग्न होते. पतंग कापल्यानंतर ढोल, येवल्याची प्रसिध्द हलगी वाजविण्यात येत होती.

हेही वाचा : जळगाव जिल्ह्यात दोन दिवसात चार खून

बाहेरगावी असणारे या काळात येवल्यात दाखल झाल्याने कुटूंबांमधील पतंगोत्सवाचा आनंद व्दिगुणित झाला. येवल्यातील पतंग कमी वाऱ्यात उडतात. कारण त्यात वजनाने हलक्या काड्या वापरल्या जातात. या दिवशी मोठ्या आकारातील वेगवेगळ्या प्रकारच्या पतंगी उडविण्याचे कौशल्य अनेकांकडून दाखवले गेले. यात पुरूषांच्या बरोबरीने महिला, युवतींचा सहभाग लक्षणीय सहभाग राहिला. घर व इमारतींच्या गच्चीवर फाफडा, जिलेबी, वडापाव, मिठाई अशा वेगवेगळ्या खाद्य पदार्थांवर ताव मारला गेला. अंधार पडल्यावर आतषबाजीला सुरुवात झाल्याने जणूकाही दिवाळी सुरु झाल्याचे वाटत होते.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In yeola fire crackers on the second day of makar sankranti in nashik district css