जय अहिराणी… जय खान्देशच्या गजरात संपूर्ण धुळे शहर दुमदुमून निघाले. खान्देशातील सण, उत्सव, परंपरांचे दर्शन घडविणाऱ्या देखाव्यासोबत निघालेल्या दिंडीमुळे शहराचे वातावरण अहिराणीमय झाले. निमित्त ठरले आजपासून सुरू झालेल्या सहाव्या अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलनाचे. आहिराणी सारस्वतांचा कुंभमेळा सुरू झाला असून, या संमेलनाला खान्देशासह महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशातून नामवंत अहिराणी साहित्यिकांनी हजेरी लावली आहे.
सकाळी दिंडी काढण्यात आली. माजी मंत्री रोहिदास पाटील, लताताई पाटील, आ. कुणाल पाटील आणि संमेलन अध्यक्ष रमेश बोरसे यांच्या हस्ते ग्रंथ पूजन करण्यात आले. त्यानंतर अहिराणी दिंडीच्या पालखीची धुरा आमदार कुणाल पाटील यांनी खांद्यावर घेत दिंडी मार्गस्थ केली. दोन दिवस चालणारे अहिराणी साहित्य संमेलन स्वातंत्र्य सेनानी अण्णासाहेब चुडामण पाटील साहित्य नगरी, हिरे भवन येथे होत आहे. आज सकाळी दहा वाजता गांधी पुतळ्यापासून अहिराणीच्या पालखीचे व ग्रंथाचे पूजन करून दिंडीला सुरुवात झाली.
हेही वाचा – नंदुरबार जिल्ह्याची साडेपाच कोटींची औषध खरेदी रखडली, तांत्रिक मान्यता मिळूनही विलंब
दिंडीमध्ये कानबाई, गौराई, भुलाबाई, डांख्या वाद्य, आदिवासी नृत्य, पोतराज, गोंधळी, व्हलर वाजा, लग्नाचे देवत, भजनी मंडळ असे खान्देशातील संस्कृतीचे दर्शन घडवणारे वैविध्यपूर्ण सजीव देखावे सादर करण्यात आले होते. कानबाईचे गाणे, आदिवासी नृत्य, अहिराणी गाणे यामुळे वातावरण भारावून निघाले होते. खानदेशी वाजंत्री, आदिवासी वाद्य, तसेच वल्हर वाजंत्रीवर आमदार कुणाल पाटील यांनी ठेका धरला. त्यामुळे, त्यांच्यासोबत उपस्थित असलेले लोकप्रतिनिधी, तसेच साहित्यिकांनीही ठेका धरल्यामुळे दिंडीमध्ये रंगत वाढली.
हेही वाचा – नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूक : मतदानासाठी जांभळ्या स्केच पेनचा वापर करण्याचे निर्देश
सातासमुद्रापार अहिराणीचा डंका
खान्देश आणि अहिराणी भाषेचा डंका सातासमुद्रपार गाजत असल्याचे या संमेलनाच्या वैशिष्ट्यातून दिसून आले. ईटली या देशाच्या खान्देश साहित्य संस्कृतीच्या अभ्यासक अलीचे डेफ्लोरियान यांची उपस्थिती लाभली. त्या खान्देशातील बोलीभाषा, अहिराणी, साहित्य, संस्कृतीचा अभ्यास करीत आहेत. आज सकाळी निघालेल्या साहित्य दिंडीत त्यांनीही खान्देशी नृत्यावर ठेका धरला, तर उद्घाटन संमारंभालाही त्या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्या उपस्थितीमुळे आपल्या अहिराणी भाषेचा डंका सातासमुद्रापार वाजल्याचा अभिमान उपस्थित खानदेशवासियांना झाला. यावेळी उद्घाटक उत्तम कांबळे, संमेलनाचे अध्यक्ष रमेश बोरसे, माजी आमदार शरद पाटील, काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, अतुल भाऊ सोनवणे, डॉक्टर सुशील महाजन, साहित्यिक कृष्णा पाटील, जगदीश देवपूरकर आदी उपस्थित होते.